17, 18 जानेवारीला स्वामीराज महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वामीराज प्रकाशन या संस्थेतर्फे प्रायोगिक रंगभूमीला ऊर्जा देणारी वार्षिक रंगजत्रा स्वामीराज महोत्सव यंदा 17 व 18 जानेवारी रोजी भरणार आहे. यशवंत नाटय़ मंदिर, साळगावकर प्रायोगिक रंगमंच येथे हा महोत्सव साजरा होईल. महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून नाटय़रसिकांना मुक्त प्रवेश आहे.

स्वामीराज महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते जनार्दन लवंगारे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यंदाचा महोत्सव अभिनेते-दिग्दर्शक रघुनाथ कदम यांचा स्मृती जागर असेल, अशी माहिती आयोजकांनी दिली. या महोत्सवात ‘गावय’, ‘मास्क’, ‘थिम्मक्का’ या तीन एकांकिका, ‘युगानुयुगे तूच’, ‘जन्म एक व्याधी’ हे दोन दीर्घांक आणि ‘साठा उत्तरांची कहाणी’ हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे. समारोप सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेता अनिल गवस आणि दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर उपस्थित राहणार आहेत.

चेतन दळवी, जयवंत देसाई, टाकळे, हडप यांना पुरस्कार

या महोत्सवात अभिनेता चेतन दळवी (रंगसेवा पुरस्कार), विजय टाकळे (संहिता सन्मान), अमर हिंद मंडळ, दादर (प्रयोगघर पुरस्कार), लीला हडप (धुळाक्षर पुरस्कार) आणि जयवंत देसाई (सेवाव्रती पुरस्कार) यांना गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.