
महापालिकेच्या निवडणूक प्रशासनाचा अभूतपूर्व गोंधळ चव्हाटय़ावर आला आहे. उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊनही निवडणूक विभागाकडून अद्ययावत आणि अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. निवडणूक विभागाच्या या सावळय़ा गोंधळामुळे निवडणूक लढविणाऱया उमेदवारांनाही कोण कोणाविरुद्ध आहे, हे समजेनासे झाले आहे.
अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जात नसल्याने निवडणूक विभागावर दबावाची चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक विभागातील अधिकारी एकमेकांकडे बोट करीत असून, निवडणूक प्रमुख असलेले महापालिका आयुक्त नवलकिशोर राम या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांसह राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर 24 तास उलटूनही अचूक आणि अंतिम याद्या निवडणूक विभागाने जाहीर केल्या नाहीत. आता चिन्हवाटप झाले तरीदेखील अंतिम याद्या जाहीर केल्या जात नाहीत. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध करून दिली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मतदारांमध्येही संभ्रम
आतापर्यंतच्या उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी आणि माघार या प्रक्रियांमध्ये कोणतीच माहिती वेळेवर आणि पूर्णपणे जाहीर न केल्याने कोण कोणाविरुद्ध, कोण कोणत्या पक्षातून लढतोय, हे समोर येत नाही. त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम असून, प्रचाराला आल्यानंतर उमेदवारांची माहिती मिळत आहे.
अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
निवडणूक कार्यालयाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांना विचारले असता त्यांनी माहिती व जनसंपर्क आणि सोशल मीडियाचे प्रमुख असलेले तुषार बाबर यांच्याकडून माहिती घ्यावी, असे सांगितले. यावर बाबर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडून माहिती येत नसल्याने वेळेत माहिती देता येत नसल्याचे सांगितले.
शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युती प्रभाग 16च्या उमेदवार स्वाती बोरकर यांनी वझिरा नाका येथून प्रचारास सुरुवात केली. यावेळी विधानसभा प्रमुख शरयू भोसले, विधानसभा संघटक प्रवीण प्रधान, विधानसभा समन्वयक मीनाक्षी चांदोरकर, शाखाप्रमुख विपुल दारुवाले, प्रेरणा राणे, ग्राहक संरक्षण कक्ष संघटक संतोष कोठारी, सुनील शिर्पे, बाळा सावंत, किरण कानडे, मनसेचे अनिल झोंबाडे, वैभव बोरकर, शिरीष सबनीस, सुहास जोशी, सतीश पवार, भानू पांडे, दर्शन केनी, अर्चना कांबळे, संकेत मटकर, विजय शेंडगे, पार्थ कोतावडेकर, अविनाश पाठारे उपस्थित होते.



























































