घाटीच्या अधिष्ठातांकडून शिवसेना उमेदवाराला धमकी, छत्रपती संभाजीनगरमध्ये आचारसंहिता भंगाची शिवसेनेची तक्रार

शिवसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुव्रे यांनी फोनवरून धमकी दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असून, त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात नमूद केले की, मनपा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुव्रे यांनी फोन करून ‘कशाला पालकमंत्र्यांच्या नादी लागतोस, उमेदवारी मागे घेऊन टाक’ असे बोलले आहेत. ही बाब निवडणूक आचारसंहितेनुसार गंभीर आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे डॉ. शिवाजी सुव्रे यांच्या विरोधात निवडणूक आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा शिवसेना पक्ष याविषयी निवडणूक आरोगाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

डॉ. सुव्रे यांच्या निलंबनाची मागणी

अतिरिक्त अधिष्ठाता यांना खरे तर बेकायदेशीरपणे येथील नियुक्ती दिली गेलेली आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायसंस्थेनेदेखील या बेकायदेशीर नियुक्तीची दखल घेतलेली असून, डॉ. शिवाजी सुव्रे यांना फक्त 22 जून 2024 पर्यंतच नियुक्तीचे आदेश आहेत. तरीही ते पदावर कायम आहेत. त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

चिन्ह देण्यावरून शनिवारी गोंधळ

शिवसेनेच्या प्रभाग 4 मधील उमेदवार सावित्री वाणी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी मशाल चिन्ह अचानक नाकारले. न्यायालयाने एबी फॉर्म असल्याने चिन्ह देण्यात यावे, असे आदेशही दिले होते. तरीही चिन्ह नाकारल्यामुळे शनिवारी रात्री अंबादास दानवे आक्रमक झाले होते. दानवे आणि निवडणूक अधिकारी यांच्यात झालेल्या वादानंतर अखेर वाणी यांना मशाल चिन्ह मिळाले.