दिग्गज नेते, स्टार प्रचारकांचा खर्च उमेदवारांच्या खात्यातूनच; निवडणूक आयोगाने जारी केले दरपत्रक

सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता सर्वच उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. प्रचारासाठी दिग्गज स्टार प्रचारकांना बोलावण्यासाठी उमेदवारांनी एकीकडे तयारी सुरू केली आहे, मात्र त्याचवेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांना झटका दिला आहे. नेते आणि स्टार प्रचारक प्रचारासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरने येतील, असे आयोगाने गृहित धरले असून त्याचा खर्च उमेदवारांच्या खात्यात विभागून टाकला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना स्वतःच्या प्रचारासाठी हात आखडता घ्यावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाने प्रचारासाठी होणाऱ्या खर्चासाठी दरपत्रक जारी केले आहे. त्यात शाकाहारी, मांसाहारी जेवण, चहा, नाष्टा तसेच हॉटेलमध्ये राहण्याच्या व्यवस्थेपासून वाद्यांचे दर ठरवून दिले आहेत. याशिवाय एखाद्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या हवाई प्रचार दौऱ्यांचा खर्च त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या खर्चात विभागून टाकण्यात येणार आहे.

उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती?

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, उमेदवारांना यावेळी निवडणुकीत प्रत्येकी 9 लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. या खर्चात स्वतःच्या प्रचार यंत्रणेसोबतच पक्षाकडून होणारा खर्चदेखील विभागून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांचा खर्च उमेदवारांच्या बोकांडी बसणार आहे. या सर्व खर्चाचा हिशेब उमेदवारांना आयोगाकडे द्यावा लागेल.