
शहर व उपनगरांतील प्रदूषण रविवारी पुन्हा वाढले आणि मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न चिंतेचा विषय बनला. डिसेंबर महिन्यात 200 ते 300 अंकांच्या आसपास राहिलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट 356 अंकांच्या चिंताजनक पातळीवर पोहोचला. त्यामुळे दृश्यमानतेमध्ये अचानक मोठी घट झाली. खराब हवेचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवडय़ापासून हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. उच्च न्यायालयाच्या सक्त निर्देशानंतरही शहरातील अनेक बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होताना दिसत नाही. त्याचा हवेच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. रविवारी अचानक प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ झाली. हवेच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘एक्यूआय डॉट इन’ या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार, दुपारी 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास संपूर्ण शहराचा एक्यूआय 356 अंकांवर झेपावला. याचदरम्यान तापमान 29 अंशांच्या आसपास होते. वातावरणातील विचित्र बदलामुळे हवा प्रचंड प्रदूषित झाली आणि काही मीटरच्या अंतरावरील परिसरही दिसेनासा झाला. बहुमजली इमारती सकाळपासून प्रदूषित हवा आणि धुरक्याच्या गराडय़ात हरवून गेल्या होत्या. प्रदूषण नियंत्रणात आणण्यात पालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात मुंबईकरांची प्रदूषणाच्या गंभीर संकटातून सुटका होण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे.
अनेक भागांतील एक्यूआय ‘तीनशे’पार
रविवारी शहराच्या अनेक भागांत हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत होती. याठिकाणचा एक्यूआय ‘तीनशे’पार गेला. मालाडमध्ये 305, देवनार-307, माझगाव-305, चकाला-306, अंधेरी पश्चिम-305, कुलाबा-314 तसेच नेव्ही नगरमध्ये 307 अंकांच्या पातळीवर गुणवत्ता निर्देशांक नोंद झाला. तसेच कांदिवलीमध्ये 223, बोरिवली पूर्व-260, मुलुंड पश्चिम-223, पवई-250, ठाणे-270, नवी मुंबई -285, वांद्रे-283, वांद्रे कुर्ला संकुल-293 आणि विलेपार्ले पश्चिम -297 अंक अशाप्रकारे आरोग्याला घातक हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला.
काही काळ बांधकामे बंद का ठेवत नाही?
प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाही पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या यंत्रणा उदासीन आहेत. सरकारच्या गांभीर्यशून्य भूमिकेवर मुंबईकर संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आहेत. वाढते प्रदूषण थेट मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम करीत आहे. असे असताना पालिका प्रशासन धूळ पसरवणारे बांधकाम प्रकल्प काही काळासाठी बंद का ठेवत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबईकर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया नोंदवत असून सरकार आणि पालिकेने प्रदूषणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावी, अशी मागणी करीत आहेत.
































































