
अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या लष्करी कारवाईमुळे जगाचे भू-राजकीय आणि आर्थिक चित्र पूर्णपणे बदलले आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा आहे. हा साठा अंदाजे तब्बल 303 अब्ज बॅरल एवढा आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रचंड संपत्तीवर अमेरिकेचे नियंत्रण येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल 17 ट्रिलियन डॉलर्सचा खजिना अमेरिकेच्या ताब्यात गेला आहे.
57 डॉलर प्रति बॅरलनुसार, सध्या व्हेनेझुएलाच्या तेल साठय़ाचे मूल्य अंदाजे 17.3 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे 1530 लाख कोटी रुपये एवढे आहे. ही रक्कम अमेरिका आणि चीन वगळता जगातील कोणत्याही देशाच्या जीडीपीच्या तुलनेत अधिक आहे.
आता अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल बाजारात मोठी गुंतवणूक करेल आणि हे तेल चीनसह जगातील इतर देशांना निर्यात करेल, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. कारण आता या खजिन्यावर अमेरिकेचा अघोषित कब्जा होईल.
‘ओपेक’ देशांचे वर्चस्व धोक्यात
शनिवारी पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिकन पंपन्या व्हेनेझुएलातील कोलमडलेल्या तेल पायाभूत सुविधा दुरुस्त करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील. आम्ही तेलाच्या व्यवसायात आहोत आणि ते जगाला विकू.’ या निर्णयामुळे ऑर्गनायजेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपार्ंटग पंट्रीज ‘ओपेक’ देशांचे वर्चस्व धोक्यात येऊ शकते आणि सौदी अरेबिया व रशियासारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांच्या धोरणांना मोठा फटका बसू शकतो.
व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षपदी डेल्सी रॉड्रिग्ज
व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांना देशाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय सातत्य आणि देशाची व्यापक सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. 56 वर्षीय डेल्सी रॉड्रिग्ज या व्हेनेझुएलातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानल्या जातात. निकोलस मादुरो यांच्या निष्ठावान म्हणून त्यांना ओळखले जाते. निकोलस मादुरो यांच्या मंत्रिमंडळात डेल्सी रॉड्रिग्ज या उपराष्ट्राध्यक्ष, अर्थमंत्री आणि तेलमंत्री म्हणून कारभार पाहत होत्या.
मादुरो ब्रुकलिनच्या जेलमध्ये
अमेरिकेने अटक करून नेलेले व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ब्रुकलिन जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावरील ड्रग्ज तस्करींच्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
व्हेनेझुएलावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक सोमवारी बोलावण्यात आली आहे. ‘व्हेनेझुएलाच्या बाबतीत अमेरिकेने केलेली कृती हा घातक पायंडा आहे,’ असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटले आहे.

























































