
सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा आज पूर्णत्वास गेला आहे. गेल्या 61 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणाचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला. सांगली शहरातील सुमारे 13 एकर (5 हेक्टर 08 आर) क्षेत्रफळाची मोक्याची जागा आज महापालिकेने प्रत्यक्ष ताब्यात घेतली.
सदर जागा सांगली येथील जुना सर्व्हे नं. 99/2 (नवा सर्व्हे 30/2/अ) अशी असून, ती महानगरपालिकेच्या विकास आराखडय़ात ट्रक पार्ंकग, वर्कशॉप व ट्रान्सपोर्ट ऑफिस या महत्त्वपूर्ण सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित आहे.
या जमिनीच्या ताब्यासंदर्भात तत्कालीन सांगली नगरपरिषदेने सन 1964 मध्ये न्यायालयात रे. द. नं. 140/1964 अन्वये दावा दाखल केला होता. या दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेत महानगरपालिकेच्या विधी विभाग व नगररचना विभागाने सातत्याने व प्रभावीपणे पाठपुरावा केला. अखेर न्यायालयाने महानगरपालिकेच्या बाजूने निकाल देत, जागेचा प्रत्यक्ष ताबा देण्याचे आदेश दिले.
आयुक्त सत्यम गांधी यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल महानगरपालिकेच्या विधी विभाग व नगररचना विभागाच्या चिकाटीपूर्ण व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. 61 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेला हा ताबा सांगली शहराच्या पायाभूत सुविधा विकासासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
ट्रक पार्किंग, वर्कशॉप, ट्रान्सपोर्ट ऑफिसचा मार्ग मोकळा
या मोक्याच्या जागेचा ताबा प्राप्त झाल्यामुळे शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी अत्यावश्यक असलेले अत्याधुनिक ट्रक पार्ंकग, वर्कशॉप व ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झाला आहे. शहराच्या नियोजनबद्ध, सुव्यवस्थित व दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे.

























































