अनिल कपूरचा ‘नायक 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अनिल कपूरचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नायक’ हा राजकीय नाट्यमय चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरला. नायक या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तब्बल 25 वर्षांनी अनिल कपूर यांनी या चित्रपटाचे हक्क मिळवले आहेत. त्यांना या चित्रपटाचा सिक्वेल बनण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी हे हक्क मिळवले असल्याचे समजते. मूळ एएस रत्नम यांनी निर्मित केलेल्या नायक चित्रपटाचे हक्क नंतर निर्माते दीपक मुकुट यांनी विकत घेतले होते.

सूत्राचा हवाला देत, बॉलिवूड हंगामाने वृत्त दिले की, “सनम तेरी कसम फेमचे निर्माते दीपक मुकुट यांच्याकडे नायकचे हक्क होते. असे म्हटले जात आहे की, अनिल कपूर यांनी त्यांच्याकडून हक्क मिळवले आहेत. हा चित्रपट अनिक कपूर यांच्या खूप जवळचा असून त्यांना हा चित्रपट खूप भावतो. त्यामुळेच त्यांनी सिक्वेल बनवण्याकरत या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत.

‘नायक २’ सिक्वेल बद्दल अद्याप अधिकृत कोणतीही पुष्टी झालेली नाही. ‘नायक’ ही एका सामान्य माणसाची कथा होती जो एका दिवसासाठी एका राज्याचा मुख्यमंत्री बनतो. या चित्रपटात राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल, सौरभ शुक्ला, जॉनी लिव्हर, शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांनी काम केले होते. पूजा बत्राने एका गाण्यात कॅमिओ केला होता, तर सुष्मिता सेनने एका गाण्यात विशेष भूमिका साकारली होती. हा चित्रपट शंकर यांच्या १९९९ च्या तमिळ चित्रपट ‘मुधलवन’चा रिमेक आहे.

यातील महत्त्वाची बाब म्हणजे नायक या चित्रपटासाठी दिग्दर्शक शंकर यांची पहिली पसंती ही आमिर खान आणि शाहरुख खान यांना होती. परंतु अनिल कपूरने ही भूमिका करण्यासाठी दिग्दर्शकला पटवून दिले होते की, हा रोल ते उत्तमरीत्या निभावतील. अशी माहिती त्यांनी काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली होती.