
महायुतीचा धर्म फक्त भाजपनेच पाळायचा का, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष व प्रचारध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अहिल्यानगर येथे उपस्थित केला. मात्र, याच वेळी नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित प्रश्नांवर बगल देत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
आज (5 जानेवारी) अहिल्यानगर येथे भाजपच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना चव्हाण बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, आमदार मोनिका राजळे, अक्षय कर्डिले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले, “आदल्या दिवशी अजित पवार नेमके काय बोलले हे आधी पाहावे, त्यानंतर त्यांना दिलेले उत्तरही तुम्ही पाहिले आहे. त्यांनी आधी बोलले म्हणून त्यांना उत्तर देण्यात आले. महायुतीचा धर्म पाळायची जबाबदारी फक्त भाजपचीच आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उमेदवारी वाटपावर बोलताना ते म्हणाले, “अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे पदाधिकारी राहिले आहेत. मात्र महायुतीत जागावाटप करताना सर्व इच्छुकांना संधी मिळत नाही. त्यामुळे काहींवर अन्याय होतो—हे फक्त भाजपमध्येच नाही, तर इतर पक्षांतही घडते.”
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याबाबत आणि दळवी यांनी पाठिंबा दिल्याबाबत विचारले असता, “मला याबाबत काही माहिती नाही,” असे उत्तर चव्हाण यांनी दिले. दरम्यान, नारायण राणे यांनी “सध्या राजकारण होत असल्याने मंत्रिपद स्वीकारणार नाही” असे केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, “मी आज नगरमध्ये प्रचार रॅलीसाठी आलो आहे,” असे म्हणत चव्हाण यांनी या मुद्द्यावर बोलणे टाळले आणि पत्रकार परिषद आटोपती घेतली.


































































