
मुंबईसह राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान 15 जानेवारीला होणार आहे. आता सर्वच पक्षांकडून प्रचार सुरू आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फोरी झडत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्षांना जे विशेष अधिकार दिले आहेत, त्या विशेष अधिकारांचे हनन होत आहे. आर्थिक भ्रष्टाचार, संविधानिक स्वरूपाचा भ्रष्टाचार या प्रकरणामध्ये नार्वेकर हे दोषी असल्याने त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये राष्टपतीनी बडतर्फ करायचा हवं, ही आमची मागणी आहे, असे सपकाळ म्हणाले. यांच्या सत्तेची ही भूक आता मोठी झाली आहे आणि लोकशाहीला गिळायला बसले आहेत. पैस्याचा खेळ आता पुन्हा गिरवला जात आहे. महापालिकेत आता बेशरम चारित्र्य घेऊन भाजप उतरले आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.
निवडणून येण्याआधीच भाजपने घोडेबाजार मांडला आहे. त्यांच्या करस्थानाचा आम्ही निषेध करतो. संविधान आणि निकोप लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही हा निषेध करत अहोत. पैशांचा मोठा खेळ झाला आहे आणि निवडणूक आयोग याच मूक साक्षीदार बनला आहे. काळ आपल्याला माफ करणार नाही वेळीच आपण सावध झालो नाही तर नोटाच अधिकार अबाधित आहे.
राष्ट्रपती, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष ही सगळी संवैधानिक पदं आहेत. निवडून आल्यावर त्यांनी कुठल्याही पक्षाशी संबंध ठेवायला नको पण नार्वेकर यांच्या कपाळी करंटेपण आहे. त्यांना अध्यक्ष का केलं कारण पक्षांतर बंदी कायदा यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना मदत केली. संविधानाचा मर्डर त्यांनी केला आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष केलं. राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात कोण कामं करतात याची माहिती आम्ही घेतं आहोत. जे गुंड आणि भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना तिथे पदावर बसवलं आहे. निवडणूक आयोग गप्प का आहे, असा सवालही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.


































































