
>> स्वप्नील साळसकर
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत पडलेल्या पावसामुळे यंदा आंबा हंगाम लांबला आहे. कोकणच्या राजाचा झिम्मा यंदा महिनाभर उशिराने सुरू होणार असून हापूसची अविट गोडी चाखण्यासाठी खवैयांना मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. बदलत्या वातावरणात कलमांवरील मोहराची स्थिती काही ठिकाणी चांगली तर काही ठिकाणी निराशाजनक असून दुसऱया टप्प्यातील आंबा मोहराकडे बागायतदार, शेतकऱयांचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्ग जिह्यात समुद्रपट्टय़ात तर देवगड, वेंगुर्ले तालुक्याच्या कातळी, डोंगराळ भागात हापूसचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. देवगडमधील कुणकेश्वर, कातवणपासून आरे, वळीवंडे भागातील पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात थंडी पडल्याने दवामुळे मोहर करपला आहे.
समुद्रपट्टय़ातील विजयदुर्ग, गिर्ये, पुरळ, तिर्लोट, आंबेरी भागात मोहराची स्थिती चांगली असून लहान फळ (कणी) पडण्यास सुरुवात झाली आहे. सध्यस्थितीत काही ठिकाणी दोन ते तीन तर काही भागांत त्याहूनही अधिक फवारण्या करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी थ्रिप्सचा प्रादुर्भाव होता. यंदा मात्र अद्याप कोणतेही संकट नसून शेतकऱयांना चांगले उत्पादन मिळेल, अशी माहिती कीटकशास्त्र्ाज्ञ डॉ. अजय मुंज यांनी ‘सामाना’शी बोलताना दिली.
‘नशीब खुलात तेव्हा…’
उशिरापर्यंत पाऊस पडला तरी त्यानंतर लगेचच मोहोर येण्यास सुरुवात झाली. मात्र त्यादरम्यान थंडीचे प्रमाण वाढले आणि मोहोर करपला. फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेला. ‘नशीब खुलात तेव्हा बघूया’ अशी साद देवगड तालुक्यातील आरे गावचे बागायतदार प्रशांत फाळके यांनी निसर्गाला घातली आहे. दुसऱया टप्प्यातील मोहर तारून नेईल का, या आशेवर ते डोळे लावून बसले आहेत. देवगडमधील शेतकरी नवीन येणाऱया मोहराकडे लक्ष ठेवून आहेत मात्र मालाला सुरुवातीला दर मिळणार नसल्याचे फाळके यांनी सांगितले.
यंदा आंब्याला मोहर भरगच्च दिसत असला तरी फळधारणा खूपच कमी प्रमाणात दिसून येते. त्यात पुढील कालावधीत थंडी वाढली तर मोहोर करपून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनाबाबत खात्री देणे आता तरी शक्य नाही.
दादा सामंत, शेतकरी, भोगवे, वेंगुर्ले































































