काँग्रेसच्या बारा नगरसेवकांची हकालपट्टी

अंबरनाथ नगर परिषदेत सत्तेसाठी भाजपसोबत युती करणाऱया काँग्रेसच्या नगरसेवकांना आज प्रदेशाध्यक्षांनी जबरदस्त दणका दिला. कोणाला विचारून भाजपशी युती केली, असा सवाल करतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडून आलेल्या सर्व 12 नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचेही निलंबन करून ब्लॉक कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. या कारवाईनंतर सर्व 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाला डावलून स्थापन केलेली भाजपची सत्ता मात्र अबाधित राहणार आहे.

अंबरनाथ नगर परिषदेत भाजप आणि शिंदे गटाची युती फिस्कटली. या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. भाजपचे 16 नगरसेवक कमळ चिन्हावर निवडून आले. या निवडणुकीत शिंदे गटाचे 23, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक निवडून आले. मात्र राज्यात शिंदे गटाशी युती असलेल्या भाजपने अंबरनाथमध्ये शिंदे गटाला दूर लोटत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. याचा शिंदे गटालाही मोठा धक्का बसला. मात्र आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लेखी पत्रक जारी करून त्यांच्या सर्व 12 नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे थेट पत्रकच काढले.

आरोपप्रत्यारोपांचा धुरळा

अंबरनाथ काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले असून शहर ब्लॉकची कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली. आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. आपल्या पक्षाचे 12 सदस्यही निवडून आले आहेत, पण आपण प्रदेश कार्यालयात कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेत भाजपच्या सदस्यांसोबत गठबंधन केल्याचे प्रसारमाध्यमांमधून कळले. ही बाब अत्यंत गंभीर आणि पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. त्यामुळे तुमचे तत्काळ निलंबन करत आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लेखी पत्र जारी केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी तर थेट प्रदेशाध्यक्षांवरच आरोप केला. महायुतीची जोरदार हवा असतानाही काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले. आमची साधी विचारपूस काँग्रेस नेत्यांनी केली नाही. उमेदवारांच्या प्रचाराला पाठ फिरवली. असे असतानाही काँग्रेसचे 12 नगरसेवक विजयी झाले. सदस्यांची कोणतीही बाजू ऐपून न घेता निलंबन केल्याने आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले.