तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेल कंपनीवर ईडीची धाड; हवालाच्या संशयावरून कार्यालयाची झाडाझडती, ईडीच्या कचाट्यातून ममतांनी फायली हिसकावल्या

राजकीय सल्लागार कंपनी आयपीएसी तसेच कंपनीचे संचालक प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर गुरुवारी ईडीने धाड टाकली. ‘आयपीएसी’कडे तृणमूल काँग्रेसच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. या धाडीची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रतीक जैन यांच्या घरी धडकल्या. ईडीने हात लावण्याअगोदरच त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच उमेदवारांची माहिती असलेल्या फायली ताब्यात घेतल्या. पक्षाशी संबंधित कागदपत्रे आणि उमेदवारांच्या याद्या जप्त करणे हे ईडीचे आणि अमित शहांचे काम आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

‘आयएपीसी’ अर्थात इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी ही राजकीय सल्लागार कंपनी असून प्रतीक जैन हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी राजकीय पक्षांना निवडणूक धोरण, डेटावर आधारित प्रचार, माध्यम नियोजन आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करते. 2021 पासून आयएपीसी तृणमूल काँग्रेसचा आयटी सेल म्हणून काम करत आहे. आज ईडीने आयएपीसी कंपनीच्या कार्यालयावर आणि प्रतीक जैन यांच्या घरावर एकाच वेळी धाड टाकली. हवाला व्यवहाराच्या आरोपावरून ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ममता बॅनर्जींनी फायली ताब्यात घेतल्या

प्रतीक जैन यांच्या घरावर ईडीची टोळधाड पडल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिकडे धाव घेतली. ईडीने कागदपत्रांना हात लावण्याच्या आत ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची माहिती असलेल्या सर्व फायली ताब्यात घेतल्या.