
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात एक मोठा बस अपघात झाला आहे. येथील हरिपूरधार येथे एक खाजगी बस दरीत कोसळली. यात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. शिमला जिल्ह्यातील कुपवी येथून सोलनला जात असताना बसचे नियंत्रण सुटले आणि हरिपूरधार येथे दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये सुमारे ४० ते ५० लोक होते. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सध्या बचावकार्य सुरू आहे. बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी हा दुर्दैवी अपघात घडला. हरिपूरधार येथे एका खाजगी बसचा ताबा सुटला आणि ती दरीत कोसळली. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे ३० जणांना वाचवण्यात आले आहे. स्थानिक रहिवासी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. पोलिसांचे पथकही घटनास्थळी उपस्थित आहे.





























































