​मतांसाठी ‘गोमाता’ आणि खासगीत ‘कापाकापी’? याला म्हणतात हिंदुत्वाचा ‘बळी’! रावसाहेब दानवेंच्या व्हिडीओवर अंबादास दानवेंची टीका

भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्येला परवानगी दिल्याची जाहिर कबुली एका कार्यक्रमात दिली आहे. या कार्यक्रमातील त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रावसाहेब दानवे यांचा जालना येथील एका सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते म्हणतात की ”जेव्हा सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा केला. तेव्हा काही लोकं माझ्याकडे आले व मला म्हणाले की सरकारने कापण्यावर बंदी घातली आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले की जोपर्यंत रावसाहेब दानवे आहे तुम्ही तो पर्यंत हे सर्व बंद होऊ देणार नाही’, असे म्हटले आहे.

रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांच्या दुटप्पी भुमिकांचा चांगलाच समाचार घेतला.

”राज्यमाता’ म्हणायचं आणि ‘खाटीकखाना’ उघडायचा? याला म्हणतात हिंदुत्वाचा ‘बळी’! ​ज्या सरकारने गाईला ‘राज्यमाता’ घोषित करून गाजावाजा केला, त्याच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे “खुशाल गाई कापा” असं सांगत आहेत. हा कसला दुटप्पीपणा? ​सत्तेसाठी गाईचा वापर करायचा?​मतांसाठी ‘गोमाता’ आणि खासगीत ‘कापाकापी’? ​तुमची गँग बेगडी आहे रावसाहेब दानवे, आणि तुम्ही त्यांचे वरिष्ठ नेते. ​खरंच… ‘मोदी है तो मुमकिन है’ – अगदी गाई कापण्यापर्यंतची मुभाही”, असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.