
महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची आहे. ही मुंबई गुजरातला द्यायचे षड्यंत्र रचले गेले आहे. संकट उंबरठय़ावर येऊन उभं ठाकलं आहे. हे संकट कधी दरवाजावरती टकटक करेल आणि तुम्हाला बाहेर काढतील, हे कळणारही नाही. हे आक्रमण परतवून लावायचे असेल, मुंबई वाचवायची असेल, मुंबई मराठी माणसाच्या हातात ठेवायची असेल तर हीच वेळ आहे. एक व्हा. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवून दिलेली मुंबई तुटू देणार नाही, लुटू देणार नाही आणि झुकू देणार नाही ही शपथ घ्या, अशी साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तमाम मुंबईकरांना घातली तेव्हा लाखोंच्या जनसागरातून निर्धाराच्या वज्रमुठी आवळल्या गेल्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ऐतिहासिक शिवतीर्थावर शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी शिवशक्तीची अभूतपूर्व सभा झाली. या सभेला अलोट गर्दी लोटली होती. गर्दीचे सारे विक्रम मोडणारी ही सभा ठरली. मराठी एकजुटीचे अतिविराट दर्शन शिवतीर्थावर घडले.
उद्धव ठाकरे म्हणाले, हातात भगवा घेतलेल्या सैन्याला हात जोडून विनंती आहे, आता वेळ आली आहे… हाताची घडी सोडा आणि मशाल हाती घ्या. इंजिन सोबत आहे… विजयाची तुतारी फुंका!





























































