
शिवतीर्थावरील विराट सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्योगपती गौतम अदानींना जबरदस्त फटके दिले. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या अदानींच्या श्रीमंतीच्या वेगवान प्रवासाचे धडाकेबाज प्रेझेंटेशन त्यांनी केले. ‘अवघ्या दहा वर्षांत गौतम अदानी यांच्याइतका श्रीमंत झालेला दुसरा माणूस जगात नसेल. अख्खी मुंबई, अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश अदानींना विकायला काढलेला आहे. देशात अनेक उद्योगपती असताना फक्त या एका माणसावर मेहेरबानी केली जातेय,’ असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
मुंबई व महाराष्ट्रावर संकट आल्यामुळेच आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहोत, हे सांगताना ते संकट नेमके कसले आहे याचे पुरावेच राज ठाकरे यांनी दिले. मुंबई, महाराष्ट्र व देशातील गेल्या दहा वर्षांत कशी अदानीला दिली गेली याचे सादरीकरण त्यांनी केले. ‘एकाच माणसाला सगळय़ा गोष्टी दिल्या गेल्या. वीज दिली, सिमेंट दिले. खरंतर सिमेंटच्या उद्योगात अदानी कधी नव्हतेच, आज तो देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्यापारी आहे. सगळी पोर्ट्स, विमानतळे अदानींना दिली गेली आहेत. उद्या यांनी वीज बंद केली की सगळे अंधारात जातील. सिमेंट महाग केले तर कोणी काही बोलू शकणार नाही. जाहिराती बंद होण्याच्या भीतीने मीडिया हे दाखवत नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
वाढवण विमानतळामागे मोठा डाव
‘पालघर जिह्यात वाढवण बंदरापाठोपाठ विमानतळ उभारण्याचे प्रस्तावित आहे. हे विमानतळ उभारण्यामागे मोठे षड्यंत्र आहे. वाढवण बंदराच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या विमानतळावर मुंबई विमानतळाचा कार्गो नेला जाणार आहे. मुंबई विमानतळावरील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाईट्स नवी मुंबई विमानतळावर नेल्या जाणार आहेत. हे झाल्यानंतर मुंबईचा विमानतळ विकायला काढला जाणार. सुमारे 50 ते 60 शिवाजी पार्क मैदाने बसतील इतकी मोठी ती जागा आहे. तीही धारावीला लागून आहे. आम्हाला मुंबई तशी मिळाली नाही ना, मग आम्ही बदाबदा पैसे ओतून, जमिनी खरेदी करून घेऊ असा हा डाव असल्याचे ते म्हणाले.
भूगोल नीट समजून घ्या
मुंबई गुजरातला जोडण्यासाठी कसा लाँग टर्म प्लॅन आखला गेला आहे त्यासाठी भूगोल समजून घ्या, असे राज ठाकरे म्हणाले. ‘वाढवण बंदराला लागून गुजरात आहे. मुंबई ताब्यात घ्यायची असेल तर आधी पालघर ताब्यात घ्यावे लागेल. ठाण्याचा काही भाग, एमएमआर रिजनचा काही भाग ताब्यात घ्यावा लागेल. म्हणजे मुंबईपर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी या भागांत माणसे बदाबदा तिथे टाकली जात आहेत. मतदारसंघ फोडले जात आहेत. मराठी माणसांना फोडून मतदारसंघ ताब्यात घ्या. एकदा खासदार, आमदार, नगरसेवक सगळे ताब्यात आले की यांचे काम सोपे झाले. हे सगळे सुरू असताना आपण बेसावध आहोत. एकदा मुंबई हातातून गेली की महाराष्ट्राचा झारखंड करून टाकतील,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
युतीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकले. आता हेच भुजबळ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. अजित पवारांचे 70 हजार कोटींचे बैलगाडीभर पुरावे देणार होते. आता कोर्टात पुरावे देत नाहीत,’ याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.
सातारा, सांगलीचे बाहेरचे, मग आतले कोण?
‘बाहेरून माणसे आणून मराठी माणसाचा टक्का कमी केला जात आहे. मुंबई महापालिकेत उत्तर भारतीयांना नोकऱया दिल्या पाहिजेत. कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणाऱयांना द्यायच्या नाहीत, असे एक उत्तर भारतीय सांगत होता. सातारा, कोल्हापूर, सांगलीचे बाहेरचे आणि हे आतले झाले, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. भाजपचा कृपाशंकर सिंह उत्तर भारतीय महापौर करण्याची भाषा करतो. यांची हिंमत कशी होते?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
एकटे असलो तरी काफी आहोत!
‘मुंबईत जैन-मराठी वादावर पडदा टाकण्यासाठी एक बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी ही जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिली होती, मात्र त्यांनी भांडण मिटवण्याऐवजी जास्त भांडणे कशी लागतील हे पाहिले, असा आरोप जैन मुनी नीलेशचंद्र यांनी केला. याचा अर्थ मराठी माणसापासून गुजराती, तामीळ, उत्तर भारतीय बाजूला करायचे आणि मराठी माणसाला एकटे पाडायचे हे प्रयत्न आहेत. पण एकटे असलो तरी काफी आहोत, असे राज ठाकरे यांनी ठणकावले. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज चुकलात तर कायमचे मुकलात म्हणून समजा,’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. इतर राजकीय पक्षातील मराठी नेत्यांनाही राज ठाकरे यांनी आवाहन केले. ‘इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर मुंबई मिळाली आहे. या मुंबईसाठी, मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी एक व्हा,’ असे राज ठाकरे म्हणाले.
म्हणून मुंबई आपल्या हातात पाहिजे!
‘केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. उद्या मुंबई, ठाण्यात, कल्याणमध्ये किंवा एमएमआर रिजनमध्ये यांना काही करायचे असेल तर महापालिकेची परवानगी लागेल. अशा वेळी महापालिका आपल्या हातात असेल तर हे जमिनी विकू शकणार नाहीत. हे अदानीला जमीन देऊ शकणार नाहीत. म्हणून मुंबई आणि इतर महापालिका आपल्या हातात पाहिजेत,’ असे राज ठाकरे म्हणाले.
‘सत्ता घेऊन आम्ही काय करू? सत्तेशिवाय सुद्धा आम्ही लाथा घातल्यात. अनेक अंगावर आले, त्यांना तुडवलंच ना. पण यांचा माज या निवडणुकीत उतरवायचा आहे.’
आज मुंबई, उद्या ठाणे, पुणे, नाशिक जे जे चांगले आहे, ते विकत घेतले जात आहे. कोकणपट्टी आख्खी रिकामी करत आहेत. जमिनीच्या जमिनी विकत घेतल्या जात आहे. वसई, विरारपासून सगळे भरत येत आहेत. गुजरातमधून येणाऱयांना घरं मिळत आहेत, तुम्हाला नाकारली जात आहेत. मराठी माणसाचेच अस्तित्व नसेल तर काय चाटायच्या आहेत महापालिका? आम्ही भले वचननाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सगळे उत्तम करू, पण त्यासाठी तुम्ही असायला पाहिजेत ना?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
जमीन आणि भाषा संपली की तुम्ही मेलात!
‘बलवान, सुसंस्कृत, संपन्न आणि देशाला दिशा दाखवणाऱया महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायचे आहे. सगळ्या बाजूंनी तुमचे चावे घेतायत. उठा या जमिनीवरून असे सांगितले जात आहे, असे ते म्हणाले. हिरे, मोती, चांदी अशा अनेक मौल्यवान वस्तू असतात, पण फक्त जमिनीला रियल इस्टेट म्हणजेच खरी संपत्ती म्हणतात. तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा मेली की तुमचे अस्तित्व संपले. जगातील अनेक देश, अनेक लोक भाषा आणि जमीन गेली म्हणून संपले. हाच डाव त्यांचा आहे,’ असा सावधगिरीचा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
हिंदी लादणार असाल तर लाथच मारू
‘हिंदी ही उत्तर प्रदेश आणि बिहारचीही भाषा नाही हे तिथल्या लोकांनी समजून घेतले पाहिजे. उत्तर प्रदेशची भाषा भोजपुरी आहे. बिहारची भाषा मैथिली आणि अवधी भाषा आहे. आमचा कुठल्या भाषेवर राग नाही, पण तुम्ही लादणार असाल तर लाथच मारू,’ असेही राज ठाकरे यांनी सुनावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा’ या पुस्तकाचा दाखलाही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
अण्णामलाईची ‘रसमलाई’
‘मराठी माणूस एकत्र येऊ नये याचा बंदोबस्त यांनी केला आहे. त्यासाठी पैसे टाकून माणसे फोडली जात आहेत. मराठी म्हणून कधी एकत्र येता कामाच नयेत. आपल्याला जे साध्य करायचे ते सहज करता येईल यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत. कोणीही येऊन मराठी माणसाला वाट्टेल ते बोलत आहे. मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घरे नाकारली जात आहेत, असे सांगून राज ठाकरे यांनी भाजपचे तामीळनाडूचे अध्यक्ष अण्णामलाई यांचा समाचार घेतला. मुंबईचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय असे एक रसमलाई म्हणते. अरे भऑऑ तुझा इथे यायचा संबंध काय,’ असा हल्ला राज ठाकरे यांनी चढवला.
दोन भावांचा हा लढा ते वरून पाहत असतील…
आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर या क्षणाला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, माझे काका बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या माँ आज इथे हजर असायला हव्या होत्या, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी दोन भावांनी उभारलेला हा सगळा लढा इथे नसले तरी ते वरून पाहत असतील, असे राज ठाकरे म्हणाले.
…तर पालिकेत दीड लाख लोकांना रोजगार मिळेल! – संदीप देशपांडे
मुंबई पालिकेत तब्बल 30 टक्के कर्मचाऱयांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरल्यास पालिका दीड लाख लोकांना रोजगार देऊ शकेल. यासाठी सत्ता आल्यावर ठाकरे बंधूंनी निर्णय घ्यावा, असे आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बोलताना केले. पालिकेचा विकास केल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र केवळ रस्ते बांधले म्हणजे विकास होतो का, असा सवालही त्यांनी केला. गेल्या चार वर्षांत सत्ताधाऱयांनी पालिका ओरबाडून खाल्ली आहे. बेस्टची स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे बेस्ट पालिकेत मर्ज करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे सांगणारे भाजपचे अण्णामलाई यांचाही त्यांनी समाचार घेतला. त्या लुंगी डान्सवाल्यांना सांगायचे आहे की, इथे येऊन वाट्टेल ते बोलू नका, नाहीतर हटाव लुंगी बजाव पुंगी करून परत पाठवू, असा इशाराही त्यांनी दिला.





























































