शिवसेनेचा शब्द आहे… शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबईत घरे देणार म्हणजे देणारच! – आदित्य ठाकरे

मुंबईची ज्यांनी वर्षानुवर्षे सेवा केली, ‘मुंबईचे संरक्षण केले त्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देणार म्हणजे देणारच’ असा शब्द शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला

वांद्रे पूर्व येथील प्रभाग क्रमांक 93 च्या शिवसेना उमेदवार रोहिणी कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत प्रभावीपणे निर्णय घेतले होते, मात्र महायुती सरकारने त्यात खोडा घातला. बीडीडी चाळींचा पुनर्वसन करतानाही तिथे शासकीय कर्मचाऱयांनाही घरे मिळणार होती, परंतु महायुती सरकारने ती रद्द केली, असे ते म्हणाले.

‘वांद्रे शासकीय वसाहतीचा पुनर्विकास करून तेथील कर्मचाऱयांना घरे देण्यात यावीत यासाठी शिवसेनेने सातत्याने संघर्ष केला, आंदोलने केली. विधिमंडळातही शिवसेना आमदारांनी हा प्रश्न प्रभावीपणे मांडला. त्यानंतरही सरकारने शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासासाठी पावले का उचलली नाहीत, या प्रश्नाचे एकच उत्तर आहे ते म्हणजे भाजपा भाजपा आणि भाजपा…’ अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपा महायुती सरकारवर निशाणा साधला.

‘शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, बेस्ट कर्मचारी या सर्वांनी मुंबईची आणि मुंबईकरांची वर्षानुवर्षे सेवा केली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत हक्काचे घर मिळालेच पाहिजे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना आमदार वरुण सरदेसाई आणि उमेदवार रोहिणी कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांनी यावेळी बोलताना वांद्रे येथील महत्त्वाच्या मुद्दय़ांचा लेखाजोखा मांडत शिवसेनेने केलेली कामे अधोरेखित केली.

पहिला निर्णय शासकीय कर्मचाऱयांसाठीच असेल

‘मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीची सत्ता येताच पहिला निर्णय शासकीय कर्मचाऱयांसाठीच असेल. मुंबईत महानगरपालिकेचे सुमारे साडेचार हजार भूखंड आहेत. महायुती सरकारने त्यातील जागा मर्जीतल्या बिल्डरांना दिल्या आहेत त्या आधी काढून घेतल्या जातील आणि त्या भूखंडांवर या सर्व कर्मचाऱयांसाठी घरे उभारली जातील’, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.