…म्हणून आता कंठ फुटला, अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

पिंपरी-चिंचवड शहरासाठी भाजपने 2017मध्ये 27 आश्वासने दिली होती. त्यातील एकही पूर्ण केले नाही. मी टीका केली नाही. महापालिकेतील चुका सांगत आहे. चुका सांगणे म्हणजे टीका करणे नव्हे. निवडणूक नऊ वर्षांनी जाहीर झाल्याने आताच कंठ फुटला आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

पिंपरी-चिंचवड शहरातील पाचशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी, विकास आराखडा (डीपी) रद्द करणे आणि दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हमीपत्र रविवारी प्रसिद्ध करण्यात आले. कासारवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, काही लोकांना आता पंठ फुटला आहे. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुये पंख बोलते है! और वही लोग जो खामोश रहते है, अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते है!! अशी शेरोशायरी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यावर पवार म्हणाले ‘हर पंख फैलाने वाला परींदा उड नही पाता, कही सपने घमंड और गलत दिशा में ही तूट जाते है, हुन्नर की बाते करने से, कुछ नही होता, जमाना उसिको पहचानता है, जो मैदान में उतरके साबित करे’.

कार्तिक नव्हे आर्थिक सर!

महापालिकेतील कारभारी प्रत्येक कामात पाच आणि सात टक्के कमिशन घेत आहेत. त्यातून त्यांच्या एवढय़ा मालमत्ता झाल्या आहेत. भाजप आमदाराच्या भावाला महापालिकेत कार्तिक सर म्हणतात. कारण हे महापालिकेतील आर्थिक काम बघतात. हे कार्तिक नव्हे आर्थिक सर असल्याची टीका उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. तसेच काकांच्या पुण्याईने माझे चांगले चालल्याचेही पवार म्हणाले.