भाजप आमदार योगेश टिळेकरांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 40मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत निवडणुकीपूर्वी मतदारांना थेट आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रभागातील नागरिक यश गजमल यांनी ही तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार 10 जानेवारी 2026 रोजी तक्रारदार यांच्या आईच्या मोबाईलवर आमदार योगेश टिळेकर यांच्या नावाने एक एसएमएस प्राप्त झाला. या संदेशात निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 जानेवारी रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 3 हजार रुपये जमा केले जातील, असे नमूद करण्यात आले होते. तसेच मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हा प्रकार थेट आर्थिक प्रलोभन देऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा असल्याने तो लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. सरकारी योजनांचा किंवा सार्वजनिक निधीचा वापर निवडणूक फायद्यासाठी करणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित आमदार आणि पक्षावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.