
‘मुंबईतील सहा प्रभागांमध्ये काही अपक्ष उमेदवार शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. आम्हीच शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी शिवशक्तीचे अधिकृत उमेदवार असल्याचे भासवत आहेत. त्यांच्या या अपप्रचाराला भुलू नका. युतीच्या अधिकृत उमेदवारांनाच निवडून द्या,’ असे आवाहन शिवसेना आणि मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार याबाबत संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. मुंबईत शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. तिन्ही पक्षांनी सर्व जागांवर आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, वॉर्ड क्रमांक 67, 74, 160, 114, 123, 197 मध्ये काही पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे नमूद करत, या सहा वॉर्डांतील शिवसेना व मनसेच्या अधिकृत उमेदवारांची यादी देखील पत्रकात देण्यात आली आहे. याच उमेदवारांच्या नावापुढील मशाल व रेल्वे इंजिनाच्या चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना नेते, सचिव अनिल देसाई, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
संबंधित वॉर्डातील अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे
वॉर्ड क्र. 67 – मनसे – कुशल सुरेश धुरी – रेल्वे इंजिन
वॉर्ड क्र. 74 – मनसे – विद्या भरत आर्य – रेल्वे इंजिन
वॉर्ड क्र. 160 – शिवसेना – राजेंद्र पाखरे – मशाल
वॉर्ड क्र. 114 – शिवसेना – राजुल संजय पाटील – मशाल
वॉर्ड क्र. 123 – शिवसेना – सुनील मोरे – मशाल
वॉर्ड क्र. 197 – मनसे – रचना साळवी – रेल्वे इंजिन





























































