
टीम इंडियाने पहिल्या वन डे क्रिकेट सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडचा कडवा प्रतिकार मोडून काढत नववर्षाचा वियजाने प्रारंभ केला. हिंदुस्थानच्या या चुरशीच्या सलामीच्या लढतीत 4 फलंदाज आणि 6 चेंडू राखून बाजी मारली. मात्र, स्टार फलंदाज विराट कोहलीचे अवघ्या सात धावांनी हुकलेले शतक चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. सामनावीराची माळ विराटच्याच गळ्यात पडली.
न्यूझीलंडकडून मिळालेले 301 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 49 षटकांत 6 बाद 306 धावा करीत पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल व रोहित शर्मा या आजी माजी कर्णधारांनी अडखळती सुरूवात केली. त्यातच रोहित शर्मा 26 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आला अन् त्याने धावफलक पळवायला सुरूवात केली. त्याने गिलच्या अगोदर अर्धशतक पूर्ण करून आपले इरादे स्पष्ट केले. कोहली-गिल जोडीने दुसर्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी करीत लढतीत रंगत निर्माण केली.
गिलने 71 चेंडूंत 3 चौकार 2 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने विराटला साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करीत सामना हिंदुस्थानच्या बाजूने झुकविला. मात्र, 91 चेंडूंत 8 चौकार व एका षटकारासह 93 धावांवर कोहली बाद झाला. मग लगेच श्रेयस अय्यरचेही (49) अर्धशतक हुकले. त्यातच रवींद्र जाडेजा 4 धावांवर बाद झाल्याने न्यूझीलंडने लढतीत पूनरागमन केले. मात्र, त्यानंतर हर्षित राणाने दांडपट्टा चालवत 21 चेंडूंत 29 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने नाबाद 29 धावांची खेळी करीत वाशिंग्टन सुंदरच्या (नाबाद 7) हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने षटकार ठोकून सामना संपविला. न्यूझीलंडकडून काइल जेमिसनने 4 फलंदाज बाद केले, तर आदित्य अशोक व क्रिस्टियन क्लार्क यांना 1-1 बळी मिळाला.
कॉन्वे–निकोल्स जोडीची शतकी सलामी
दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 बाद 300 धावसंख्या उभारली. डेवॉन कॉन्वे (56) व हेन्री निकोल्स (62) यांनी 117 धावांची सलामी देत आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. हर्षित राणाच्या सहाव्या षटकात कुलदीप यादवने निकोल्सचा सोपा झेल सोडला. या जीवदानाचा फायदा उठवित त्याने अर्धशतकी खेळी साकारली. शेवटी हर्षित राणानेच 22व्या षटकात निकोल्सला यष्टीमागे लोकेश राहुलकरवी झेलबाद करीत ही जोडी पह्डली. पुढच्याच षटकात त्याने दुसरा सलामीवीर कॉन्वेचा त्रिफळा उडवून हिंदुस्थानला दुसरे यश मिळवून दिले. मग मोहम्मद सिराजने विल यंगला (12) स्थिरावण्यापूर्वीच यष्टीमागे झेलबाद करून न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला.
डॅरिल मिशेल झुंजार अर्धशतक
आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर मधल्या फळीतील डॅरिल मिशेलने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. ग्लेन फिलिप्स (12), मिशेल हाय (18) व कर्णधार मायकल ब्रेसवेल (16) हे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले, पण डॅरिलने एका बाजूने समर्थपणे किल्ला लढविला. त्याने 71 चेंडूंत 84 धावा फटकाविताना 5 चौकारांसह 3 षटकार ठोकले. झॅक फाऊल्कस (1) बाद झाल्यानंतर तळाच्या क्रिस्टियन क्लार्कने नाबाद 24 धावा करीत डॅरिल मिशेलला साथ दिली. प्रसिध कृष्णाने डॅरिलला पायचित पकडले तेव्हा न्यूझीलंडने 47.4 षटकांत 8 बाद 281 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. शेवटी क्रिस्टियनने फटकेबाजी केल्याने न्यूझीलंडला तीनशे धावांचा पल्ला गाठता आला. हिंदुस्थानकडून हर्षित राणा, मोहम्मद सिराज व प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले, तर कुलदीप यादवला एक बळी मिळाला.

























































