
विजय हजारे ट्रॉफीचा थरार आता निर्णायक टप्प्यावर आला असून देशांतर्गत क्रिकेटमधील दोन दिग्गज संघ मुंबई आणि कर्नाटक सोमवारी उपांत्यपूर्व लढतीत आमने सामने धडकणार आहेत. हा सामना केवळ उपांत्य फेरीचे तिकीट ठरवणारा नाही, तर देवदत्त पडिक्कल विरुद्ध सरफराज खान या दोन धगधगत्या फलंदाजांमधील थेट शक्तिपरीक्षा ठरणार आहे. राष्ट्रीय संघाचे पुन्हा एकदा दार ठोठावत असलेल्या या दोघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ असाच असेल.
मुंबईची ताकद सरफराज
साखळीत मुंबईला दोन सामन्यांत पराभव झेलावा लागला असला तरी अखेरच्या सामन्यात सरफराजचा झंझावात पाहण्यासारखा होता. तोच संघाचा तारणहार ठरला होता. त्यामुळे उद्याही तोच मुंबईचा मुख्य फलंदाज असेल. त्याने आपला टी-20 मधील आक्रमक फॉर्म थेट वन डे क्रिकेटमध्ये उतरवला आहे. पंजाबविरुद्धच्या पराभवातही सरफराजने पुरुषांच्या लिस्ट-ए क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी फलंदाजाचा सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम रचून निवड समिती सदस्यांपर्यंत स्पष्ट संदेश पोहोचवला. मुंबईने तो सामना गमावला असला तरी सरफराजने स्वतःची दावेदारी अधिक ठळक केली. कर्नाटकविरुद्ध त्याची बॅट पेटली तर सामना कुठल्याही क्षणी फिरू शकतो. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरच्या अनुपस्थितीत सिद्धेश लाडकडे मुंबईचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. दिग्गज नसले तरी मुंबई हा टी-20 क्रिकेटमधीलही दिग्गज संघ आहे, हे दाखवून दिले जाईल.
सात डावांत चार शतके, एक अर्धशतक आणि 640 धावा. हा आकडा पाहताच मुंबईच्या गोलंदाजांच्या भुवया उंचावणार हे नक्की. पडिक्कलची लय कायम राहिली तर 2027 वन डे विश्वचषकासाठी गुणवत्तेचा शोध घेत असलेल्या निवड समिती सदस्यांना याला डावलून किंवा विसरून चालणार नाही.
उद्या दोन लढती असल्या तरी मुंबई-कर्नाटक सामना म्हणजे केवळ उपांत्यपूर्व लढत नाही, तर भविष्यातील हिंदुस्थानी वन डे संघाची झलक आहे. पडिक्कल की सरफराज? यापैकी कोणाची बॅट अधिक आग ओकणार, यावरच या महासंग्रामाचा निकाल ठरणार आहे.
उत्तर प्रदेश आता सौराष्ट्रलाही नमवणार
हजारे करंडकाचा दुसरा उपांत्यपूर्व सामना अपराजित उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र आमने सामने येणार आहेत. लीग टप्प्यात अपराजित राहिलेल्या उत्तर प्रदेशचे पारडे जड मानले जात आहे, मात्र संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज ध्रुव जुरेल हिंदुस्थानी वन डे संघात सामील झाल्यामुळे या सामन्यास अनुपस्थित असेल. लीग टप्प्यात जुरेलने सात डावांत 558 धावा करत अक्षरशः वर्चस्व गाजवले होते. उत्तर प्रदेश फॉर्मात असला तरी त्यांना आव्हान देण्यासाठी सौराष्ट्र सज्ज झाला आहे. सौराष्ट्रने सुरुवातीचे तीनपैकी दोन सामने गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत सलग चार विजयांसह अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. फलंदाज योग्य वेळी लयीत आले आहेत, तर वेगवान गोलंदाज चेतन सकारियाचा फॉर्म उत्तर प्रदेशसाठी मोठं आव्हान ठरू शकतो.
पडिक्कलचा रनस्फोट
साखळी सामन्यात फक्त एका पराभवाचा सामना करावा लागलेल्या कर्नाटकचा फॉर्म जबरदस्त आहे, याची सर्वांना कल्पना आहे. या फॉर्ममुळे कर्नाटकचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलाय. सोबतीला देवदत्त पडिक्कल हा देवासारखा खेळतोय. अक्षरशः धावांचा पाऊस पाडतो आहे.





























































