
>> नवनाथ कुसळकर, सोनई
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात शनि महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱया शनिभक्तांची अडवणूक करून हजारो रुपयांची सक्तीची पूजा माथी मारणाऱया कमिशन एजंटांना देवस्थानचे प्रशासक असलेल्या नाशिक विभागीय आयुक्तांनी मोठा दणका दिला. कायद्याचा हिसका दाखवल्याने एजंट हद्दपार झाले. मंदिर परिसरात एजंटांचा सुळसुळाट थांबल्याने मंदिर व खासगी वाहनतळावरील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला शनिशिंगणापुरात कमिशन एजंटांच्या साडेसातीच्या फेऱयातून भाविकांची अखेर सुटका झाली.
शनिशिंगणापुरात देश-विदेशातून महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक नतमस्तक होतात. सण, उत्सव आणि शनि अमावस्या या पर्व काळात होणारी गर्दी लाखोंच्या घरात आहे. वर्षभरात एक कोटीच्या आसपास भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. वाढती गर्दी लक्षात घेता येथे भाविकांना व्यावसायिकांच्या लुटमारीचा सामना करावा लागतो. कमिशन एजंटांकडून भाविकांना अडवून सक्तीची पूजा हा येथील गंभीर प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याला गावकरी व देवस्थान विश्वस्त असणारे कारभारी कारणीभूत ठरले होते. दरम्यानच्या काळात मंदिराचा गैरकारभार व भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने शनि मंदिर आपल्या नियंत्रणाखाली घेतले आणि व्यवस्थापनेच्या वादावरून मंदिर न्यायप्रविष्ठ ठरले. शेवटी सुप्रीम कोर्टाने नाशिक उपविभागीय आयुक्तांकडे प्रशासकाची जबाबदारी सोपविली. प्रशासक डॉ. गेडाम यांनी मंदिर परिसरातील लुटमारीला आळा घालून कमिशन एजंटांना हिसका दाखवला. मंदिर परिसर व खासगी वाहनतळावरील मुख्य रस्त्यावर भाविकांची वाहने अडवून त्यांना सक्तीची पूजा देण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या एजंटांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. मंदिर परिसरात किमान 400 ते 500 एजंट अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.
शनिशिंगणापुरात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकाला 1000 पासून चार-पाच हजारांपर्यंत पूजा साहित्य माथी मारणे, वेळप्रसंगी भाविकांना दमदाटी, मारहाण करणे असे प्रकार वाढत गेले होते. देशपातळीवर येथील लुटीची चर्चा होत गेली. राज्य सरकारने देवस्थान ताब्यात घेतले. येथील प्रशासकांनी कारभार हाती घेताच मंदिर व्यवस्थापनाबरोबरच भाविकांची लूट व कमिशन एजंटांवर कडक ऍक्शन घेतल्याने एजंटांवर पायबंध घालण्यात आल्याने किमान भाविकांची या त्रासातून सुटका झाल्याचे दिसते आहे.
पोलीस अधिकाऱयाची खरडपट्टी
शनिशिंगणापूर येथील धार्मिक स्थळावरील भाविकांची होत असलेल्या लुटीसंदर्भात येथील पोलीस ठाणे कुचकामी ठरल्याने कमिशन एजंटांबरोबरच अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. याची दखल देवस्थानचे प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांनी गावकरी व ग्रामपंचायत पदाधिकाऱयांच्या झालेल्या बैठकीत पोलीस अधिकाऱयांची खरडपट्टी काढली. सरपंच बाळासाहेब बानकर, देवस्थानचे माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे यांनी येथील कायदे व सुव्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करत कमिशन एजंटांविरोधात ठोस भूमिका घेण्याची मागणी केली. त्यानंतर डॉ. गेडाम यांनी एजंटांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला. तसेच पोलीस अधिकाऱयांना धारेवर धरल्याने सहायक पोलीस निरीक्षकांची भंबेरी उडाली.
ब्रॅण्डेड तेलाचा अभिषेक संशयास्पद
रिफायनरी केलेले शुद्ध खाद्योपयोगी तेलानेच शनिदेवाला अभिषेक तसेच अर्पण करण्याची अंमलबजावणी 1 मार्च 2025 रोजी करण्यात आली. या देवस्थानच्या आदेशालाच व्यावसायिकांनी हरताळ फासल्याचे चित्र आहे. नव्याने देवस्थानवर प्रशासकांची नियुक्ती झाली असताना भाविकांची पूजा साहित्यात होत असलेली लूट लक्षात घेत मंदिर व्यवस्थापनाने भाविकांसाठी दरफलक लावण्यात आले. या पूजा साहित्यामध्ये तेलाची किंमत देवस्थानने ठरविताना 300 रुपये लिटर हा भाव निश्चित केल्याने हा निर्णय शंका उपस्थित करणारा ठरला आहे. ब्रॅण्डेड व शुद्ध तेलाच्या नावाखाली भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.


























































