मार्लेश्वर मंदिराजवळ अवैध सुरुंग स्फोटांचा ग्रामस्थांचा आरोप; कारवाई करण्याची मागणी

संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर मंदिर परिसरात नदीपात्रात सुरुंग स्फोट केले जात असल्याचा आरोप मारळ येथील ग्रामस्थांनी केला आहे. हे स्फोट बेकायदेशीररीत्या सुरू असून त्यांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ठेकेदार तसेच सुरुंग स्फोटासाठी परवानगी देणाऱ्या संबंधितांवर तातडीने कारवाई करावी आणि स्फोटासाठी वापरलेली साधने जप्त करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या संदर्भात मारळ ग्रामस्थांनी देवरुख तहसीलदार व देवरुख पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मार्लेश्वर मंदिर परिसर इको-सेंसिटिव्ह झोनमध्ये येतो. मार्लेश्वर देवस्थान येथे श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी पुलाचे काम सुरू असून हे काम करताना ठेकेदाराकडून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरुंग स्फोट केले जात आहेत. आतापर्यंत सुमारे ५० ते ६० सुरुंग स्फोट झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मंदिराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या या स्फोटांमुळे मंदिर परिसरातील अंगण तसेच बांधकामांना तडे जात असून पर्वतावरील दगड खाली कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही सुरुंग स्फोट थांबवले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंदिर परिसर व भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने सुरुंग स्फोट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.