
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. व्हेनेझुएलावर हल्ले केल्यानंतर तसेच ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या त्यांच्या संकेतांमुळे आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आता त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी स्वतःला व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष घोषित केले आहे. त्यामुळे जागतिक चिंतेत आणि तणावात आणखी भर पडली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्पच्या अधिकृत फोटोसह पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ते सध्या व्हेनेझुएलाचे “कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” आहेत. त्यांनी २० जानेवारी २०२५ रोजी पदभार स्वीकारत अमेरिकेचे ४५ वे आणि ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःची ओळख करून दिली.
ही पोस्ट अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिकेने अलीकडेच व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकेत नेण्यात आले आणि आता ते नार्को-दहशतवादाच्या आरोपाखाली न्यू यॉर्कमध्ये न्यायालयीन कारवाईला सामोरे जात आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की सत्तेचे सुरक्षित, न्याय्य आणि समंजस हस्तांतरण होईपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलातील सत्ता नियंत्रित करेल. त्यांनी दावा केला की अमेरिका व्हेनेझुएलाच्या लोकांच्या हितासाठी ही जबाबदारी पार पाडत आहे.
व्हेनेझुएलाच्या उपाध्यक्ष आणि तेल मंत्री डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे, परंतु ट्रम्पच्या दाव्यामुळे या अंतरिम सरकारच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की व्हेनेझुएलाचे अंतरिम सरकार अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल “उच्च दर्जाचे प्रतिबंधित तेल” पुरवेल, जे बाजारभावाने विकले जाईल आणि त्यातून मिळणारे उत्पन्न अमेरिका आणि व्हेनेझुएला दोघांनाही जाईल. ते चांगल्या कामासाठी वापरले जाईल. त्यांनी अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांना ही योजना त्वरित अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.



























































