
भाजपचा आणि मराठी अस्मितेचा संबंध नव्हताच, पण शिवसेनेत असताना जे स्वतःला ‘हिरे’ समजत होते, तेही ढेकणांच्या संगतीने भंगले आहेत. कृपाशंकर, अण्णामलाईच्या महाराष्ट्रद्रोही वक्तव्याचा साधा निषेधही न करणाऱ्या राज्यकर्त्यांना व त्यांच्या समर्थकांना ‘षंढ’ नाही म्हणायचे तर दुसरे काय म्हणावे? एखाद्याने शरणागतीचे पांढरे निशाण फडकवावे व गुडघे टेकावेत त्याप्रमाणे या लोकांनी षंढपणाचे निशाण फडकवून महाराष्ट्राच्या शौर्य आणि स्वाभिमानाचा उपमर्द केला आहे. अण्णामलाईने पुन्हा मुंबईत येऊन तेच वक्तव्य करण्याची भाषा केली आहे. मराठी माणसाने याची नोंद घेतली आहे!
फडणवीस-मिंधेंच्या राज्यात महाराष्ट्राच्या इज्जतीची दैना उडाली आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता वगैरे बाबी पायदळी तुडवून या जोडगोळीचे भ्रष्ट राजकारण चालले आहे. कोणीही ऐरागैरा, लुंग्यासुंग्या मुंबईत येतो, महाराष्ट्राला टपली मारून जातो व मराठी राज्यकर्ते त्या लुंग्यासुंग्याचे समर्थन करतात हे चित्र भयंकर म्हणायला हवे. तामीळनाडूतील एक भिकार भाजप नेता अण्णामलाई मुंबईत भाजपचा स्टार प्रचारक म्हणून अवतरला व तो बरळला की, ‘‘मुंबई महाराष्ट्राची वगैरे अजिबात नाही. मुंबईचा महाराष्ट्राशी काय संबंध?’ भाजपची ही महाराष्ट्रद्रोही रसमलाई व्यासपीठावर पाझरत असताना मुंबई भाजपचे अनेक मराठी पुढारी व्यासपीठावर होते व त्यांना रसमलाईच्या मुक्ताफळांमुळे चीड आली नाही. हे त्यांच्या षंढपणाचे लक्षण आहे. भाजपचा हिंदुत्व किंवा मराठी अस्मितेशी संबंध नव्हताच. सत्ता व पैशांसाठी लाचार झालेले हे लोक उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राचा अपमान सहन करतात. कोण कुठला अण्णामलाई? त्याला त्याच्या तामीळनाडूत उकिरड्यावरचा कुत्रा विचारत नाही. खुद्द तामीळनाडूत त्याची गणना तामीळ अस्मिता व संस्कृतीचा गद्दार म्हणून केली जाते. त्यामुळे अण्णामलाईचे वक्तव्य ही काही संपूर्ण तामीळ जनतेची किंवा तामीळ प्रदेशाची भूमिका नाही. तामीळनाडूचे आतापर्यंतचे झालेले मुख्यमंत्री, राज्यकर्ते वगैरेंनी कधी मुंबई-मराठी माणसांविषयी विष ओकले नाही. स्वतः तामीळनाडूत द्रमुकवाले असोत नाहीतर अण्णा द्रमुकवाले, प्रत्येकाने आपली प्रांतीय व
भाषिक अस्मिता
जपण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी लढे दिले. हिंदी सक्तीविरोधात तामीळनाडू व महाराष्ट्र खांद्यास खांदा लावून लढले व शेवटी हिंदी सक्तीचे आदेश केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. तामीळनाडूच्या राजकारण्यांनी महाराष्ट्राविरुद्ध अशी ‘रसमलाई’छाप मूर्खपणाची विधाने कधीच केली नाहीत, पण भाजपने अण्णामलाईसारखे टुकार नेते ‘मुंबईत’ पाठवून त्यांच्या तोंडून महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये वदवून घेतली. तसे नसते तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘उपटे’ मुख्यमंत्री एकनाथ मिंधे यांनी मलाईचे वक्तव्य सहन केले नसते. उलट देवेंद्र फडणवीस हे मलाईच्या वक्तव्यावर पांघरुण घालताना दिसत आहेत, तर मिंधे लाचार मंडळ त्या अण्णामलाईविषयी चकार शब्द बोलायला तयार नाही. आता त्याही पुढे जाऊन अण्णामलाईने सरकारला व मराठी माणसालाच आव्हान दिले. तो चेन्नईत बसून म्हणतो, ‘‘होय, मी मुंबई महाराष्ट्राची नाही हे वक्तव्य केले व पुन्हा मुंबईत येऊन ते वक्तव्य करीन. हिंमत असेल तर मला अडवा.’’ एवढे होऊनही महाराष्ट्राचे फडणवीस सरकार आपला मिंधेपणा सोडायला तयार नाही. अण्णामलाईच्या वक्तव्याने मुंबईत शिवसेना व तामीळ जनतेत विसंवाद व्हावा, दरी निर्माण व्हावी व त्याचा फायदा भाजपला व्हावा असे भाजपचे धोरण दिसते. अण्णामलाईसारख्या लुंग्यासुंग्यांशी न लढणारी एक डरपोक सेना अमित शहांनी तयार केली व त्यांना सत्तेचे बळ दिले. पुन्हा हे लोक स्वतःला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार समजतात. हे खरेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणून
सत्तेच्या खुर्च्या उबवत
असते तर अण्णामलाईला मुंबईतून बाहेरच पडू दिले नसते, पण भाजपबरोबर व एआयएमआयएमबरोबर राहून या मंडळींनी स्वतःच्या मराठीपणाची साफ सुंता करून घेतली आहे. भाजपचा आणि मराठी अस्मितेचा संबंध नव्हताच, पण शिवसेनेत असताना जे स्वतःला ‘हिरे’ समजत होते, तेही ढेकणांच्या संगतीने भंगले आहेत. ‘उपटे’ मुख्यमंत्री एकनाथ मिंधे हे संभाजीनगरात शहा सेनेच्या प्रचारासाठी गेले व छाती ठोकून म्हणाले, ‘‘आम्ही मर्द आहोत. बाळासाहेबांच्या विचारांच्या सरकारचा आम्ही तख्तापलट केला. टांगा पलटी केला.’’ हे वक्तव्य तमाम मराठी माणसाने गांभीर्याने घ्यायला हवे. एकतर उद्धव ठाकरे यांचे सरकार हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांचेच होते हे मिंधे मंडळींनी मान्य केले व ‘‘भाजप-अमित शहांच्या आदेशाने बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्ही पाडले, टांगा पलटी केला,’’ अशी शेखी मिरवून त्यांनी आपण भाजपचे लाचार असल्याचे सिद्ध केले. अशा लाचारांकडून अण्णामलाईवर कारवाई किंवा हल्ला होईल याची अपेक्षा ठेवता येत नाही. कृपाशंकर, अण्णामलाईच्या महाराष्ट्रद्रोही वक्तव्याचा साधा निषेधही न करणाऱ्या राज्यकर्त्यांना व त्यांच्या समर्थकांना ‘षंढ’ नाही म्हणायचे तर दुसरे काय म्हणावे? एखाद्याने शरणागतीचे पांढरे निशाण फडकवावे व गुडघे टेकावेत त्याप्रमाणे या लोकांनी षंढपणाचे निशाण फडकवून महाराष्ट्राच्या शौर्य आणि स्वाभिमानाचा उपमर्द केला आहे. अण्णामलाईने पुन्हा मुंबईत येऊन तेच वक्तव्य करण्याची भाषा केली आहे. मराठी माणसाने याची नोंद घेतली आहे!

































































