मुंबईला बॉम्बे म्हणायची जुनीच सवय आहे, भाजप आमदार सेलवन यांनी अण्णामलाईची री ओढली

मुंबई ही महाराष्ट्र व हिंदुस्थानातच राहणार आहे, मात्र मुंबईला बॉम्बे म्हणायची जुनी सवय आहे. आम्ही मुंबई म्हणतो, असे सांगत भाजप आमदार तमील सेलवन यांनी ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी’ असे म्हणणाऱया भाजप नेते अण्णामलाई यांच्या वक्तव्याची री ओढली आहे.

पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत आलेल्या भाजप नेते अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा केला. एवढय़ावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही, तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे, असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शिवतीर्थावर झालेल्या सभेत अण्णामलाई यांच्या वक्तव्याचा शिवसेना-मनसेकडून चांगलाच समाचार घेण्यात आला. यानंतर अण्णामलाई यांच्या बचावासाठी भाजप आमदार सेलवन पुढे आले.

सेलवन म्हणाले, दक्षिण भारतीय महाराष्ट्रात येतात तेव्हा भाषेत फरक पडतो. मुंबईच्या आर्थिक राजधानीबाबत अण्णामलाई हे नव्यानेच हिंदीत बोलत होते. मुंबईचा जो विकास झाला ते सांगत होते. त्यामुळे त्यांच्यावर होणारी टीका ही चुकीची आहे. मुंबईत 13 टक्के दक्षिण भारतीय आहेत. माझ्या विधानसभेत 90 हजार दक्षिण भारतीय लोक आहेत, असे सेलवन म्हणाले.

तामीळनाडू आणि मराठी यांचे संबंध शेकडो वर्षांपासून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे संबंध तंजावरमध्ये आहेत. आम्ही मराठीचा सन्मान करतो. तमीळ समाज प्रत्येक ठिकाणी सेवा करत आहे, व्यवसाय करत आहेत, महाराष्ट्रात आयपीएस व आयएएस म्हणून काम करत आहेत, असे तमील सेलवन म्हणाले.