
कोपरखैरणे येथील प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिंदे गटाकडून मतदारांना पैशांचे वाटप सुरू असताना भाजपच्या पदाधिकाऱयांनी उमेदवाराच्या पुतण्याला पकडले. शिंदे गटाचे शिवराम पाटील, त्यांची पत्नी अनिता पाटील, त्यांची सून वृषाली पाटील या उमेदवारांसाठी पाटील यांचे पुतणे उमेश पाटील हे मतदारांना पैशांचे वाटप करीत होते. हे पैसे वाटप सुरू असताना भाजपचे किशोर पाटील यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर संतापलेल्या भाजपवाल्यांनी त्याची जोरदार धुलाई केली. या हाणामारीची व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सत्ताधाऱयांच्या गाड्या तपासा
मतदारांना पैसे वाटले जाऊ नयेत यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके उभे केले आहेत. मात्र या नाक्यांवर फक्त शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱयांच्या गाडय़ा तपासल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने आमच्या गाडय़ा तपासण्याऐवजी शिंदे गट आणि भाजपच्या उमेदवारांच्या गाडय़ा तपासाव्यात अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली.
डोंबिवलीत तिघे पकडले
कल्याण–डोंबिवली महापालिका प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असताना त्यांच्यावर शिंदे गटाच्या पदाधिकाऱयांनी रविवारी झडप घातली. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 65 हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक तीन हजार रुपये भरलेली पाकिटे आढळून आली आहेत. दरम्यान, पैसे वाटप करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत, अशी सारवासारव भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केली आहे.


























































