
राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार असतानाच सत्ताधाऱयांचा पैसेवाटपाचा खेळ सुरू झाला आहे. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडसह अनेक ठिकाणी अशा घटना समोर आल्या असून, नवी मुंबईत तर आज शिंदे गट आणि भाजपात पैसेवाटपावरून तुफान राडा झाला.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत राज्यात पैशाचा पाऊस झाला होता. सत्ताधारी पक्षांनी या निवडणुकीवर कोटय़वधी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. जिथे सत्ताधारी पक्ष एकमेकांविरुद्ध लढत होते अशा काही ठिकाणी तर एकमेकांवरच धाडी टाकून पैसेवाटप चव्हाटय़ावर आणले होते. तोच खेळ महापालिका निवडणुकीतही दिसू लागला आहे.
पुण्यात भाजप आणि अजित पवार गटाकडून मतदारांना लक्ष्मीदर्शन
पुणे आणि पिंपरी-चिंडवड महापालिकेची निवडणूक राज्यातील सत्ताधारी भाजप आणि अजित पवार गटाने खूपच प्रतिष्ठsची केली आहे. या दोन्ही पक्षांकडून मतदारांना लक्ष्मीदर्शन घडविल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपने एका मतासाठी आठ हजार तर अजितदादा गटाच्या उमेदवारांकडून चार हजार रुपयांचे वाटप झाल्याची चर्चा आहे.
लातूरमध्ये भाजपकडून पैसेवाटप
लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून पैसेवाटप होत असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे. प्रभाग क्रमांक 11मधील भाजप उमेदवारांसाठी पैशाचे वाटप केल्याची तक्रार काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने
सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पैसेवाटपावरून राडा झाला. अजित पवार गटाचे आमदार इंद्रिस नायकवडी आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर धावून गेले. यामुळे मिरजमध्ये तणावाचे वातावरण आहे. नायकवडी यांचा मुलगा प्रभाग क्र. 20 मधून निवडणूक लढवत आहे. त्यांच्याकडून निवडणुकीत मतदारांना पैसेवाटप करण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या उमेदवाराकडून करण्यात आला. त्यानंतर मिरजेतल्या जवाहर चौक येथे नायकवडी यांच्या घरासमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले.


























































