निवडणूक अधिकाऱ्यांचा अजब निर्णय, प्रचार कालावधी संपल्यानंतरही उमेदवाराला घरोघर प्रचाराची मुभा

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी 13 जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. निवडणूक अधिकाऱयांनी मात्र प्रचार कालावधी संपल्यानंतरही उमेदवाराला घरोघर प्रचार करण्याची मुभा दिली आहे. या अजब निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी महानगरपालिकेच्या ए, बी आणि ई विभागातील सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांची नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये हा अजब निर्णय नमूद आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना 13 जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. परंतु त्यानंतरही 15 जानेवारीपर्यंत ते घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची पत्रके वाटता येणार नाहीत, असे इतिवृत्तामध्ये नमूद आहे. याशिवाय बैठकीत घेतलेल्या इतर निर्णयांचाही त्यात समावेश आहे.