
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात जोरदार कलगीतुरा रंगला. पुण्यात भाजप आणि अजित पवार गटाची युती नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात भिडले असून अजित पवार यांनी महापालिका प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुण्यामध्ये भाजपच्या एका उमेदवाराचा ‘बाप’ काढला. माझा काका तुझ्या बापापेक्षा खूप मोठा आहे, असे वक्तव्य केले. यामुळे भाजप आणि अजित पवार गटातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी अजित पवार यांनी पुण्यात रोड शो केला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, येथील प्रभाग 4 मधील विरोधी उमेदवार टँकर माफिया असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. इथे कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पण काही कच्चे नाही. मी मोठय़ा काकांचा पुतण्या आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा आहे, असे ते भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे यांचे नाव न घेता बोलले.
‘शरीफ आहोत म्हणून एकत्र’
अजित पवार म्हणाले, सुरेंद्र पठारेंचे वडील तुतारीचे आमदार आणि सून व मुलगा भाजपचा उमेदवार आहेत. अशी ही बनवाबनवी सुरू आहे. हे मतदारांना गृहित धरत आहेत. आम्ही काय दुधखुळे आहोत का? आता म्हणतात विकास करू. एवढे दिवस काय केले? आम्ही शरीफ आहोत. कुणाशीही लढत नाही. शरीफ आहोत म्हणून तुमच्यासोबत राज्यात व पेंद्रात आहोत.
‘बिबटय़ाबरोबर लांडगेही आले’
अजित पवार यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावरही कडाडून टीका केली. भोसरीच्या सभेत अजित पवार म्हणाले, भारंदाज डाव टाकून यांना फिरवून फिरवून फेकून नाही दिला तर पवारांची औलाद सांगणार नाही. बिबटय़ाबरोबर आता लांडगेही आलेत. सगळे लांडगे एका माळेचे मणी नाहीत. एखादा आंबा नासका असतो. पण तो वेळीच काढला नाही तर तो अख्खी आडी नासावतो.
भाजपच्या जाहीरनाम्यावर अजित पवारांची टीका
भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना पीएमपीएल आणि मेटरी मोफत करणार म्हणाले. 75 वयाचे किती ज्येष्ठ प्रवास करतात हे सांगा. आता काय 75 वय होईपर्यंत झुरून-झुरून वाट बघायची का, असा खोचक सवालही पवारांनी उपस्थित केला. मोफत मेट्रोच्या घोषणेवर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, यासाठी पॅबिनेटच्या मान्यतेची गरज नाही. मी जे मोफत देतोय त्याचा मी अभ्यास केला आहे.
























































