
अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उमेदवार अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा मारल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शिंदेंच्या उमेदवाराची प्रकृती बिघडली असून त्यांना शहरातील आनंद ऋषीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुण्यात हलवण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. हवालाच्या माध्यमातून पैसे आल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयोगाच्या पथकाने सोमवारी रात्री धाड टाकली. छाप्यात काय सापडले याबाबतही प्रशासनाकडून मौन पाळण्यात आले आहे; मात्र कारवाईमुळे अनिल शिंदे यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे सांगण्यात आले.
ज्यांच्यासोबत राज्यात घरोबा, त्यांच्यावरच आरोप
अहिल्यानगर महापालिका निवडणूक शिंदेंचा गट स्वबळावर लढत आहे. आजच्या छाप्यानंतर मिंधे गटाने प्रशासनावरच आरोप केले आहेत. विशिष्ट नेत्यांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई होत असून आमच्या उमेदवाराबाबत प्रशासन वेगळय़ा निकषांनी वागत असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवत्ते संजीव भोर यांनी केला.
























































