आचारसंहिता काळात पुण्यात मद्यसाठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

महानगरपालिका निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कारवाई केली आहे. 15 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत एकूण 370 गुन्हे दाखल करण्यता आले आहेत. या कारवाईत सुमारे पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे महापालिका हद्दीत 210 गुन्हे दाखल झाले आहेत. सुमारे 1.70 कोटी रुपयांचा देशीविदेशी मद्य तसेच बनावट मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. 345 संशयितांना अटक करण्यात आली असून 33 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पिंपरीचिंचवडमध्ये 93 गुन्हे

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 93 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत 2.29 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने 129 संशयितांना अटक केली असून मद्य वाहतूक करणारी सात वाहने जप्त करण्यात आली आहेत.