
महापालिका निवडणुकीचा प्रचार संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकत झाडाझडती घेतली. तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ही कारवाई कोणत्या प्रकरणात करण्यात आली, याचा तपशील मिळू शकला नाही.
अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये सभा सुरू असतानाच अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनी कार्यालयावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अरोरा यांनी निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेससाठी ‘किंक कॅम्पेन’सारख्या प्रचार मोहिमा राबवल्या होत्या. पवारांनी प्रचारात भाजपवर मोठय़ा प्रमाणात टीका केली होती.
दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नरेश आरोरा यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, आमच्या कार्यालयात नेमके कोणते कामकाज चालते, तसेच पक्षाशी संबंधित कोणती कामे होतात याची माहिती पोलिसांनी घेतली. कोणतीही कागदपत्रे जप्त केली नाहीत. मी दहा वर्षे हे काम करत असून कधीही चुकीचे काम केलेले नाही. राजकीय काम करताना अशा प्रकारच्या चौकशा होतच राहतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा नरेश अरोरा व त्यांच्या डिझाइन बॉक्स कंपनीच्या पाठीशी उभा आहे. – अजित पवार, उपमुख्यमंत्री


























































