
मुंबईत 227 प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभेत वापरलेली केंद्राची ईव्हीएम वापरली जाणार आहेत, तर राज्यातील अन्य 28 पालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची ईव्हीएम वापरण्यात येणार आहेत.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मुंबईवगळता उर्वरित 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आहे. येथे मतदाराला तीन, चार किंवा पाच अशी मते द्यावी लागणार आहेत. या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग आपली स्वतःची मतदान यंत्रे वापरणार आहे.
…तरच मुंबईत ‘पाडू’चा वापर
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आली तरच ‘पाडू’ (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) या यंत्राचा वापर केला जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मुंबईत 140 ‘पाडू’ची उपलब्धता करून देण्यात आली आहे.






























































