पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा ‘वीकेण्ड’ डोकेदुखीचा! शनिवारी आणि रविवारी 240 लोकल फेऱ्या रद्द होणार

पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या प्रवाशांना येत्या ‘वीकेण्ड’ला मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. शनिवारी आणि रविवारी लोकलच्या 240 फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे.

बोरिवली आणि मालाडदरम्यान शुक्रवारी व शनिवारी रात्री 11.15 ते मध्यरात्री 3.15 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर, तर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी दिवसभरात प्रत्येकी 120 लोकल फेऱया रद्द होणार आहेत. यात अप आणि डाऊन दिशेने जाणाऱया प्रत्येकी 60 लोकल फेऱयांचा समावेश असणार आहे. ब्लॉकच्या निमित्ताने कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत 100 हून अधिक लोकल फेऱया रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण लोकलसेवेचे वेळापत्रक कोलमडत आहे. ऐन ‘पीक अवर्स’ला अनेक गाडय़ा रद्द केल्या जात असल्याने ट्रेन तसेच रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी होत आहे. साध्या लोकलच्या तुलनेत एसी लोकलच्या अधिक फेऱया धावणार असल्याने सामान्य प्रवाशांना फटका बसणार आहे.