
झुंजार वृत्तीच्या न्यूझीलंडने संक्रांतीच्या दिवशी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान हिंदुस्थानचा पतंग कापत मालिकेतील आव्हान कायम राखले. पाहुण्यांनी या ‘जिंका किंवा मरा’ सामन्यात ७ विकेट्स राखून, तसेच १५ चेंडू शिल्लक ठेवत बाजी मारली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. नाबाद शतकी खेळी करणारा डॅरिल मिशेल विजयाचा मानकरी ठरला, तर लोकेश राहुलची नाबाद शतकी खेळी व्यर्थ ठरली. आता या मालिकेचा फैसला रविवारी इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात होणार आहे.
हिंदुस्थानकडून मिळालेले २८५ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४७.३ षटकांत ३ बाद २८६ धावा करत सहज गाठले. डेव्हन कॉन्वे (१६) आणि हेन्री निकोल्स (१०) या सलामीच्या जोडीला स्वस्तात तंबूत पाठवून हिंदुस्थानी गोलंदाजांनी आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र त्यानंतर विल यंग (८७) आणि डॅरिल मिशेल (नाबाद १३१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५२ चेंडूंमध्ये १६२ धावांची भागीदारी करत सामना हिंदुस्थानच्या हातातून खेचून नेला. ३८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कुलदीप यादवने नीतिश कुमारमार्फत झेलबाद करत यंगला बाद केले आणि ही जोडी फोडली. त्यानंतर डॅरिल मिशेलने ग्लेन फिलिप्सच्या (नाबाद ३२) साथीत ७८ धावांची अभेद्य भागीदारी करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मिशेलने ११७ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद शतक झळकावले, तर फिलिप्सने २५ चेंडूंमध्ये २ चौकार आणि १ षटकार ठोकला.
कर्णधार गिलचे अर्धशतक
त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हिंदुस्थानी कर्णधार शुभमन गिल (५६) आणि रोहित शर्मा (२४) यांनी ७० धावांची सलामी देत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. १३व्या षटकात ख्रिस्तियन क्लार्कने रोहित शर्माला बाद करत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. रोहितने ३८ चेंडूंमध्ये चार चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या. १७व्या षटकात काईल जेमिसनने शुभमन गिलला बाद करत हिंदुस्थानला दुसरा धक्का दिला. गिलने ५६ धावांची खेळी केली.
राहुलचे संकटमोचक शतक
संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी केएल राहुल संकटमोचक ठरला. त्याने ९२ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ११२ धावांची शानदार खेळी केली. राहुलने रवींद्र जाडेजासोबत ८८ चेंडूंमध्ये ७३ धावांची, नीतिश कुमार रेड्डीसोबत ४९ चेंडूंमध्ये ५७ धावांची, तर मोहम्मद सिराजसोबत २८ धावांची उपयुक्त भागीदारी केली. ३९व्या षटकात मायकेल ब्रेसवेलने जाडेजाला बाद करत ही भागीदारी मोडली. जाडेजाने ४४ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या, नीतिश कुमार रेड्डीने २१ चेंडूंमध्ये २० धावा केल्या, तर हर्षित राणा २ धावांवर नाबाद राहिला. अखेरच्या दोन षटकांत राहुलने आक्रमक फटकेबाजी केल्यामुळे हिंदुस्थानला ७ बाद २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. विराट कोहली (२३) आणि श्रेयस अय्यर (८) हे दोघेही लवकर बाद झाल्याने संघाची अवस्था ४ बाद ११८ अशी झाली होती.



























































