
इराणच्या जनतेने 1979 मध्ये राजेशाहीविरुद्ध पहिली क्रांती करून देशात पहिल्या खोमेनींची इस्लामी राजवट आणली. तीच इराणी जनता आज दुसऱ्या खोमेनींच्या कट्टर इस्लामी राजवटीविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. ज्याला आधी घालवले त्याच राजाच्या अमेरिकेत बसलेल्या सुधारणावादी ‘प्रिन्स’ला सत्तेवर आणण्यासाठी इराणच्या जनतेने पुन्हा दुसऱ्या क्रांतीचे बिगुल फुंकले आहे. ‘इराण का पेटला?’ या प्रश्नापेक्षा त्या आगीत तेल ओतण्याचे अमेरिकेचे प्रयत्न अधिक धोकादायक आहेत. इराणसारखा तेलविहिरींनी समृद्ध असलेला देश आंदोलनाच्या वणव्यात जळत असताना त्यावर अमेरिकेने आपली पोळी भाजली नाही तरच नवल!
टोकाच्या धार्मिक कट्टरतावादाविरुद्ध इराणमध्ये क्रांतीची ठिणगी पडली आहे. हां हां म्हणता या ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले व गेल्या बारा दिवसांपासून संपूर्ण इराण पेटला आहे. जनता आणि सरकारचे पोलीस व सुरक्षा दले यांच्यात अक्षरशः युद्ध भडकले आहे. संपूर्ण इराणभर अराजक पसरले आहे. सर्वत्र जाळपोळ, हिंसाचार, सरकारी कचेऱ्यांवर हल्ले सुरू आहेत. अर्थात, क्रांतीची ही ठिणगी भडकवण्यामागे खरोखरच इराणच्या जनतेचा सहभाग आहे की संपूर्ण जगाचा खलिफा होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अमेरिकेने ही आग भडकवली आहे या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल. त्यातच इराणचे सर्वोंच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी हे आंदोलन चिरडण्यासाठी ‘शूट अॅट साईट’ अर्थात दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जारी केल्याने या आगीत पेट्रोल ओतण्याचेच काम केले. आतापर्यंत आंदोलक आणि सुरक्षा दले मिळून दोन हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याचे प्राथमिक आकडे आहेत. आंदोलकांवर होणारा गोळीबार आणि हजारो आंदोलकांना झालेली अटक यामुळे हे आंदोलन शांत होण्याऐवजी ते अधिकच भडकले. इराणच्या शंभरहून अधिक शहरांमध्ये लोक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. ‘हुकुमशाही खतम करा’, ‘डेथ टू खोमेनी’ अर्थात ‘खोमेनीला खतम करा’, अशा घोषणा देत हजारो इराणी नागरिक गोळीबार व मृत्यूची पर्वा न करता आंदोलनात सहभागी होत आहेत. इराणच्या नागरिकांनी धारण केलेले हे उग्र रूप पाहता त्यांना कुठल्याही परिस्थितीत सत्तेमध्ये बदल हवा आहे हे स्पष्ट दिसते. रस्त्यावर पेटलेली ही आग आता सत्तेच्या दरवाजापर्यंत पोहोचली आहे. आंदोलन चिघळू नये यासाठी इराण
सरकारने दहा दिवसांपासून
इंटरनेट बंद ठेवले आहे. मात्र अमेरिकेतील ‘स्टारलिंक’ या सॅटेलाईट इंटरनेटच्या माध्यमातून इराणमधील आंदोलक सोशल मीडियाचा वापर करून निरोपांची देवाणघेवाण व सरकारी दडपशाहीची माहिती पसरवत असल्याने या हिंसक आंदोलनाचा भडका दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतो आहे. खोमेनी यांना ठार करून इराणचे अमेरिकेत असलेले निर्वासित प्रिन्स रेझा पहेलवी यांना देशात परत आणून त्यांच्याकडे इराणची सत्ता सुपूर्द करावी, ही आंदोलकांची मुख्य मागणी आहे. इराणमधील कट्टरता संपुष्टात आणावी व सुधारणावादी विचार घेऊन इराणने प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करावे, ही जनतेची दुसरी मागणी आहे. हिजाबशिवाय बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना मृत्युदंड देणाऱ्या खोमेनी यांच्याविरुद्ध इराणी महिलादेखील रस्त्यावर उतरल्या आहेत. हिजाबशिवाय घराबाहेर पडून महिला खोमेनींची पोस्टर्स सिगारेटने पेटवत आहेत. कठोर निर्बंधांची कट्टरता आणि सुधारणावाद असा हा वरवर संघर्ष दिसत असला तरी या आंदोलनाला अमेरिका व इस्रायलची फूस नाही, असे म्हणता येत नाही. इराणमध्ये पेटलेल्या सरकारविरोधी दंगलींचे, जाळपोळींचे व आंदोलकांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने तोंड फाटेस्तोवर कौतुक करत आहेत ते पाहता अमेरिकेच्या इशाऱ्यावरूनच हे घडत असल्याचे स्पष्ट दिसते. ‘इराणी राजवट उलथवून फेकण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचा उत्साह अविश्वसनीय आहे’, अशा शब्दांत प्रे. ट्रम्प यांनी इराणी जनतेचे कौतुक केले आहे. ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी इराणी आंदोलकांना सरकारी संस्थांवर ताबा मिळवण्याची सूचना केली. ‘‘अमेरिका तुमच्या सोबत आहे, तुम्हाला मदत करण्यासाठी अमेरिकेची रसद लवकरच पोहोचत आहे’’, असे विधान करून प्रे. ट्रम्प यांनी इराणमध्ये पेटलेल्या आगीत आणखी
तेल ओतण्याचे काम
केले. अलीकडेच इस्रायलसोबत झालेल्या बारा दिवसांच्या युद्धानंतर इराणची अर्थव्यवस्था सपशेल कोलमडली आहे. शिवाय इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या कार्यक्रमामुळे अमेरिकेने लादलेल्या कित्येक वर्षांच्या निर्बंधांनी इराणचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे इराणच्या जनतेमध्ये तेथील सरकार व सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्याविरुद्ध तीव्र असंतोष आहे. मात्र आज जे इराण पेटले आहे, त्यामागे उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था किंवा महागाई हे मुख्य कारण दिसत नाही. इराणमधील कट्टरपंथी इस्लामी राजवट उलथवून टाकणे, हादेखील तेथील जनतेचा अजेंडा दिसत आहे. इराणच्या जनतेने 1979 मध्ये राजेशाहीविरुद्ध पहिली क्रांती करून देशात पहिल्या खोमेनींची इस्लामी राजवट आणली. तीच इराणी जनता आज दुसऱ्या खोमेनींच्या कट्टर इस्लामी राजवटीविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. ज्याला आधी घालवले त्याच राजाच्या अमेरिकेत बसलेल्या सुधारणावादी ‘प्रिन्स’ला सत्तेवर आणण्यासाठी इराणच्या जनतेने पुन्हा दुसऱ्या क्रांतीचे बिगुल फुंकले आहे. ‘इराण का पेटला?’ या प्रश्नापेक्षा त्या आगीत तेल ओतण्याचे अमेरिकेचे प्रयत्न अधिक धोकादायक आहेत. इराणसारखा तेलविहिरींनी समृद्ध असलेला देश आंदोलनाच्या वणव्यात जळत असताना त्यावर अमेरिकेने आपली पोळी भाजली नाही तरच नवल! लोकशाही वाचवण्याची ढाल पुढे करून अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे इराणनेही रशिया व चीनच्या साथीने अमेरिकेला मूंहतोड जवाब दिला तर मध्यपूर्वेतील देशांत युद्धाचा भडका उडू शकतो. जगाला हे परवडणार आहे काय?


































































