
बांगलादेश क्रिकेटमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली असून खेळाडूंनी आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. खेळाडूंविरोधात अपमानास्पद विधान करणारे क्रिकेट मंडळाचे संचालक नजमुल इस्लाम यांनी सार्वजनिक माफी मागितल्याशिवाय आपण खेळातील बहिष्कार मागे घेणार नाही, असा स्पष्ट इशारा क्रिकेटपटूंनी दिला आहे. गुरुवारी संध्याकाळी खेळाडूंनी यासंदर्भात अधिपृत निवेदन प्रसिद्ध केले. या बहिष्कारामुळे याच दिवशी देशांतर्गत टी-20 स्पर्धा तसेच ढाका क्रिकेट लीगमधील सामने रद्द करावे लागले.
जरी बांगलादेश क्रिकेट मंडळाने नजमुल इस्लाम यांना आर्थिक समितीच्या अध्यक्षपदावरून हटवले असले तरी खेळाडू त्यांच्या संचालकपदावरूनही हटवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. क्रिकेटपटू कल्याण संघटनेचे प्रमुख मोहम्मद मिथुन यांच्या नेतृत्वाखालील खेळाडू आणि क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्यातील चर्चेत सार्वजनिक माफी हा मुख्य वादाचा मुद्दा ठरला आहे.
गुरुवारी रात्री झालेल्या पह्न संभाषणात अमिनुल इस्लाम यांनी नजमुल इस्लाम केवळ बंद बैठकीत माफी मागू शकतात, असे सांगितल्याने वरिष्ठ खेळाडूंमध्ये तीच्र नाराजी पसरली.
कल्याण संघटनेने स्पष्ट केले की, नजमुल इस्लाम यांनी खेळाडूंविषयी जाहीरपणे अवमानकारक शब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागणे अत्यावश्यक आहे. त्यांनी माफी मागितली आणि संचालकपदाबाबतची प्रक्रिया सुरू राहिली, तर आम्ही शुक्रवारपासून पुन्हा मैदानात उतरण्यास तयार आहोत.
दरम्यान, शुक्रवारी नियोजित असलेले देशांतर्गत स्पर्धेतील सामनेही या वादामुळे धोक्यात आले आहेत. एपूणच, बांगलादेश क्रिकेटमधील हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून क्रिकेट मंडळ पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
































































