
पंतनगर, समता कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर मतदारांची मतदान केंद्रे बदलण्यात आली. गेल्या काही महापालिका निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी मतदान झाले होते, तेथे नेहमीप्रमाणे गेलेल्या मतदारांना मतदार यादीत नाव नसल्याचा धक्का बसला. त्यानंतर मतदारांची धावपळ सुरू झाली.
पंतनगरमधील मतदारांना काही बूथवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अनेकांची नावे समता कॉलनीतील मतदान केंद्रांमध्ये टाकण्यात आली आहेत. त्यामुळे मतदार समता कॉलनीतील महापालिकेच्या शाळेत गेले. तेथे बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर मतदारांना नावे सापडली आणि त्यांनी मतदान केले.
दरम्यान, हजारो मतदारांना महापालिकेने मतदानाच्या पावत्या वितरित केल्या नाहीत. त्यामुळे आपले मतदान केंद्र बदलल्याची माहिती मतदारांना मिळालीच नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
बोगस मतदाराची नोंद पकडली
हृषीकेश पगारे या मतदाराने त्यांच्या पत्त्यावर एका अनोळखी व्यक्तीचे नाव मतदार म्हणून नोंद झाल्याचा प्रकार उघडकीस आणला. राजीव गांधी नगर परिसरात राहणारे पगारे यांनी सांगितले की, “माझ्या पत्त्यावर नागेश्वर गुप्ता या बोगस मतदाराचे नाव नोंदवण्यात आले आहे. ही बाब मी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.”






























































