
भाजपा उमेदवारांना मतदान करण्यासाठी बदनापूर येथून आणलेल्या ३ हजारांवर बोगस मतदारांना मुकुंदवाडीतील एका हॉटेलमध्ये ठेवून मतदान करून घेण्याचा डाव शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. बोगस मतदारांना ताब्यात घेण्याची मागणी करीत घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी येथे घडला.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी आज गुरुवारी मतदान झाले. भाजपा नेत्यांनी बोगस मतदानाचा डाव रचला. त्यासाठी भाजपा आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर येथून ३ हजारावर बोगस मतदार आणून मुकुंदवाडीतील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप करून शिवसैनिकांनी बोगस मतदान रोखावे, अशी मागणी करून घोषणा दिल्या. बोगस मतदान रोखण्याऐवजी घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी टार्गेट करत लाठीचार्ज केला, असा आरोप शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केला आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या भगिनी निवडणूक लढवित आहेत. त्याचबरोबर भाजपाने अन्य उमेदवारही उभे केले आहेत. सत्तेच्या जोरावर विजय खेचण्यासाठी या मंडळींनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ ही घडविले. परंतु प्रत्यक्ष आज मतदान प्रक्रियेत त्याचे चित्र दिसत नसल्यामुळे बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर येथून बोगस मतदार आणून मुकुंदवाडीतील एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
बोगस मतदारांविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी करत शिवसैनिकांनी मतदान केंद्राबाहेर असलेल्या मुकुंदवाडी येथील राजर्षी शाहू विद्यालयासमोर घोषणा दिल्या. येथे जमावही मोठ्या प्रमाणात जमा झाला. बोगस मतदान रोखण्याऐवजी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांवर लाठीचार्ज केला, असा आरोप युवा सेनेचे जिल्हा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केला. ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है।’ अशा घोषणा दिल्या. यावेळी हॉटेलमध्ये असलेल्या बोगस मतदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांनी केली. बोगस मतदानासाठी आलेल्या मंडळीवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब जगताप यांनी केली आहे. दरम्यान, याच मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु भाजपा आमदाराचा दबाव असल्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांनी टाळले आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.































































