तीन घरं, तीन ऑटो रिक्षा, लक्झरी कार अन् कोट्यवधींची संपत्ती; व्यापाऱ्यांना कर्ज देणाऱ्या श्रीमंत भिकाऱ्याची रंगतेय चर्चा

रस्त्यावर लाकडी फळीवर सरपटत जाणारा एक हतबल अपंग माणूस, पाठीवर जुने फाटके दप्तर आणि मदतीसाठी केविलवाण्या नजरेने पाहणारा चेहरा… इंदूरच्या सराफा बाजारात गेली अनेक वर्षे हे दृश्य पाहून कोणालाही दया यायची. त्यामुळे लोक त्याला भिकारी समजून खिशातून पैसे काढून द्यायचे. पण कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की, ज्या माणसाला आपण मदत करतोय , तो माणूस प्रत्यक्षात शहरातील एका मोठ्या व्यापाऱ्यालाही लाजवेल इतक्या संपत्तीचा मालक आहे. मात्र सत्य कधीच जास्त काळ लपून राहत नाही. सध्या या भिकाऱ्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांगीलाल असे या श्रीमंत भिकाऱ्याचे नाव आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या पथकाने जेव्हा मांगीलाल नावाच्या या भिकाऱ्याला रेस्क्यू केले, तेव्हा तपासात एकामागून एक धक्कादायक खुलासे झाले. तो केवळ भिकारी नसून, इंदूरमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 3 आलिशान पक्क्या घरांचा मालक निघाला. यामध्ये भगतसिंग नगरमधील 16 बाय 45 फुटांची तीन मजली इमारत, शिवनगरमधील 600 स्क्वेअर फुटांचे घर आणि अलवास भागातील 1 बीएचके घराचा समावेश आहे. आजच्या बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत कोटींच्या घरात आहे.

मागांलालकडे फक्त घरेच नाही तर याहून अधिक मालमत्ता आहे. तपासादरम्यान समोर आले की, त्याच्याकडे स्वतःची डिझायर कार आणि तीन रिक्षा आहेत. विशेष म्हणजे, तो स्वतः या गाड्या वापरत नसून त्या भाड्याने देऊन त्यातून मोठा नफा कमवत होता. शासनाने त्याला आधीच दिव्यांग कोट्यातून घर मिळवून दिले होते आणि तो एका आश्रमातही राहत होता. तरीही अधिक पैसा कमवण्याच्या हव्यासापोटी त्याने भीक मागण्याचे नाटक सुरूच ठेवले होते.

सराफा बाजारात बसून भीक मागणे हेच त्याचे रोजचे काम होते. त्यामुळे तेथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मांगीलालवर कधीच संशय़ आला नाही. मांगीलाल हा फक्त भिकारी नसून त्याने मिळालेल्या पैशातून व्याजाचा मोठा व्यवसाय सुरू केला होता. तो दररोज सराफा बाजारात फक्त भीक मागण्यासाठी जात नव्हता, तर तिथल्या अनेकांना दिलेल्या कर्जाचे व्याज वसूल करण्यासाठी जायचा. भीक मागून आणि व्याजाचे पैसे मिळून त्याची रोजची कमाई 400 ते 500 रुपये व्हायची. ‘मी कोणाकडेही जबरदस्तीने पैसे मागत नाही, लोक स्वतःहून देतात’ असे त्यांने चौकशीत कबूल केले.

दरम्यान या भिकाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेअंतर्गत मांगीलालवर कठोर कारवाई केली जात आहे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश सिन्हा यांनी असे स्पष्ट केले की, संपत्ती असूनही गरिबीचे ढोंग करून लोकांची फसवणूक करणे हा गुन्हा आहे. अशा लोकांमुळे समाजातील खऱ्या गरजू व्यक्तींपर्यंत योग्य ती मदत पोहचू शकत नाही.या घटनेने इंदूरमध्ये एकच खळबळ उडाली असून, दानशूर नागरिकांनाही एखाद्या व्यक्तीला पैसे देण्यापूर्वी विचार करायला भाग पाडले आहे.