
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या धनगर बांधवांनी आजपासून आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली. घटनेने धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले असतानाही राज्यकर्त्यांकडून फसवणूक केली जात आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आता आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
हजारीलाल सोमाणी मार्ग येथून घोषणा देत पिवळ्या टोप्या घातलेले व हातात पिवळे झेंडे घेतलेले धनगर बांधव आझाद मैदानात पोहोचले. कफ परेड, डोंगरी, जे. जे. मार्ग, यलोगेट, वडाळा, कुलाबा, डी. बी. मार्ग येथून येणाऱ्या अनेक आंदोलकांना पोलिसांनी तिथेच ताब्यात घेतले.
धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, परंतु अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आंदोलनाची हाक द्यावी लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी यावेळी आंदोलकांना भेट देऊन मार्गदर्शन केले.



























































