केळव्याच्या पर्यटनाला विकासाचे बळ, तीन कोटींचा निधी मंजूर

bhatye-beach-ratnagiri

पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळवे समुद्रकिनाऱ्याच्या विकासाला बळ मिळणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने तीन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधा या निधीतून देण्यात येणार असून या कामांचे भूमिपूजन केळवा महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर लवकरच करण्यात येणार आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेला केळवे समुद्रकिनारा हा पर्यटकांच्या पसंतीचा परिसर समजला जातो. या समुद्रकिनाऱ्यावर आता पर्यटनाला चालना मिळणार आहे. या सर्व कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधीची तरतूद करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी या कामांना प्रशासकीय मान्यतादेखील दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तांत्रिक मान्यता घेऊन ही सर्व कामे मे महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. केळवा महोत्सवाचे आयोजन या आठवड्यात करण्यात येणार असून या महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान पायाभूत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

या सुविधा मिळणार

समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या सुरूच्या झाडांच्या बागेतील पायवाटा विकसित करण्यात येणार आहेत. वाहनांसाठी स्वतंत्र वाहतूक बेटाची उभारणी, लहान मुलांसाठी खेळाच्या साहित्यासह उद्यानाची निर्मिती, आधुनिक स्नानगृहाची उभारणी, आकर्षक सेल्फी पॉईंट यांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी समुद्रकिनारी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी पाण्याचे स्रोत विकसित करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतागृहांचे नूतनीकरण केले जाणार असून खाद्यपदार्थ विक्रीसाठी असलेल्या स्टॉलना आकर्षक स्वरूप देत स्वच्छता आणि सुव्यवस्थेवर विशेष भर देण्यात येणार आहे.

दाभोसा येथे काचेचा तरंगता पूल

जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र धबधब्याचे प्रचंड आकारमान आणि खोल दरीमुळे धबधब्याच्या तळाशी जाणे धोकादायक ठरते. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षित पद्धतीने धबधब्याचा अनुभव घेता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय धर्तीवर काचेचा तरंगता पूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. सुमारे 15 ते 20 मीटर लांबीच्या या पुलासाठी अंदाजे दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.