
फुलातून मकरंद गोळा करणाऱ्या मधमाशा आणि अन्य कीटक थंडीने गारठले आहेत. त्यामुळे परागीभवनाची प्रक्रिया मंदावली गेल्याने त्याचा जोरदार फटका यंदा आंब्याच्या उत्पादनाला बसणार आहे. जास्त थंडीमुळे मधमाशी, कुंभारमाशी, सुतारमाशी आदी कीटक बाहेर पडत नाहीत. त्याचा परिणाम अन्य पिकांबरोबर आंब्याच्या मोहोरावरही होणार असल्याने वाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आंब्याला मोहोर येण्याची वेळ व मधमाशा बाहेर पडण्याची वेळ वेगळी आहे. सध्या तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने आंब्याच्या मोहोरावर मधमाशा दिसत नाही. जर आंब्याच्या मोहोराचे परागीभवन व्यवस्थित झाले नाही तर फळांचा आकारही अतिशय लहान राहू शकतो. थंडीमुळे मधमाशांसह कुंभारमाशी आणि सुतारमाशीसह मकरंद गोळा करणाऱ्या अन्य कीटकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम आंब्यासह अन्य फळांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता कृषीभूषण शेतकरी अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
– आंब्याच्या बाजूला मोहरी, झेंडू अशी पिके असल्यास मधमाशा आंब्याकडे कमी आकर्षित होतात. कलिंगडमध्ये नर व मादी फुले स्वतंत्र असल्याने व मादी फुलांमध्ये परागकणांचे प्रमाण कमी असल्याने मधमाशा इतर जास्त परागकण असलेल्या पिकांकडे जातात. त्याचा परिणाम आंबा आणि कलिंगडच्या उत्पादनावर होत आहे.
– सध्या वातावरणात आर्द्रता कमी असल्याने परागकण लवकर सुकतात. त्यामुळे या कालावधीत मधमाशा आपल्याला कमी दिसून येतात. वातावरणात झालेल्या बदलाचा परिणामही मधमाशांच्या संख्येवर झाला आहे. मधमाशांचे प्रमाण कमी झाल्यानंतर त्याचा विपरित परिणाम उत्पादनावर होत आहे, अशी माहिती पालघरचे कीटकशास्त्रज्ञ अंकुर धने यांनी दिली आहे.






























































