देखणे न देखणे – कला निर्मिती व कलास्वाद

>> डॉ. मीनाक्षी पाटील, [email protected]

कोणत्याही कलाकृतीतील चैतन्याचा मागोवा घेताना तिच्यातील चैतन्यांशाला रसिकांतील चैतन्य तत्त्वाचा सहज स्पर्श होत असतो. म्हणूनच कोणत्याही कलाकृतीचा रसिकाला येणारा अनुभव हाच खऱ्या अर्थाने रसास्वादाचा मूलाधार ठरतो.

आपण मागील लेखात पाहिले की,  कलावंताचं आणि आस्वादकाचं अनुभव विश्व जितकं समृद्ध, तितकं ते कला निर्मितीला आणि कलास्वादाला पूरक ठरतं. हे अनुभव विश्व कसं समृद्ध होतं? कलाकृती कशा निर्माण होतात? कलास्वादाची प्रक्रिया कशी असते ? यासारख्या प्रश्नांचा वेध घेतला तर कला निर्मिती व कलास्वाद यांच्यातील नेमकं नातं उलगडू शकतं.

कलावंत असो की सर्वसामान्य माणूस दैनंदिन जगणं जगत असतानाच आपापल्या परीने आपल्या भवतालाचं कळत नकळत निरीक्षण करीत असतो. या निरीक्षणाचे ठसे त्याच्या मनावर उमटत जातात, साठत जातात, ज्यावर प्रत्येक जण आपापल्या परीने विचार करतो. कलावंताची संवेदनशीलता थोडी अधिक तीव्र असल्यामुळे तो त्या भवतालाचे विविधांगाने अन्वयार्थ लावतो, त्याच्या सहज वृत्तीनुसार चिंतन-मनन करतो. सर्वसामान्य माणसालाही बऱ्याचदा भवतालातलं काहीतरी खूप सुंदर वाटत असतं, जाणवत असतं, पण त्याला ते नेमक्या शब्दांत किंवा अन्य माध्यमांत बंदिस्त करता येत नसतं. त्याच वेळी मात्र कलावंताला त्याच भवतालातून जे जाणवतं, ते शब्द किंवा कोणत्या तरी अन्य माध्यमातून व्यक्त करावंसं वाटतं आणि इथेच कलाकृतीचा जन्म होतो.

कोणतीही कलाकृती निर्माण होताना कलावंताच्या मनोविश्वात भावस्तरावर प्रथम एक अस्वस्थता निर्माण होते. तो मनातील त्या खळबळीला, अमूर्ताला आकार देण्यासाठी धडपडू लागतो. अव्यक्ताला व्यक्त करताना, कलाकृती घडवताना कलावंताच्या मनोविश्वात मानसिक स्तरावर काही निवडीच्या निर्णय प्रक्रिया घडत जातात. या निवड प्रक्रियेत कधी सलगता तर कधी खंडितता असे अनुभव घेत घेत कलावंत अभिव्यक्तीच्या मार्गावरची एक आनंददायी निर्मिती क्रीडा अनुभवत असतो.

थोडक्यात, कलाकृती म्हणजे कलावंताने विशिष्ट साधनांद्वारे विशिष्ट माध्यमांतून घडवलेली एक नावीन्यपूर्ण अशी अनुभवाकृती असते असे म्हणता येईल. अशा रीतीने एखादी कलाकृती आकारताना तिच्यातील प्रत्येक घटकाच्या निवडीबरोबरच त्यांच्यातील परस्परसंबंधांना, त्यांच्या गुणवत्तेला विशेष स्थान असते. कारण त्यातूनच ती कलाकृती नेमका आकार घेत असते. किंबहुना कलाकृतीतील रंग, शब्द, आकार इ. इ. अशा त्या त्या घटक द्रव्यांद्वारेच आपल्याला कलाकृतीतील आशयाची, अनुभव विश्वाची जाणीव होत असते. रसिकांना ती ती कलाकृती समजून घ्यायला त्या त्या मूलभूत साधनांची माहिती असली तर मदतच होते. अशा रीतीने कलावंताने दैनंदिन जगण्यातील भावाशयातून प्रेरणा घेऊन विविध माध्यमांद्वारे अनुभवांची नावीन्यपूर्ण केलेली रचनाकृती म्हणजे कलाकृती.

आपण लेखारंभी नमूद केलं की, सर्वसामान्य माणसे व कलावंत हे भवतालाचं निरीक्षण करीत असताना आपापल्या संवेदनक्षम वृत्तीनुसार भवतालाला प्रतिसाद देत असतात. खरे तर दोघेही एकाच जीवन वास्तवाचे भाग असले तरी सर्वसामान्य माणसाला भवतालातील जे सौंदर्य जाणवते, जे चैतन्यत्व जाणवते ते त्याला नेमके व्यक्त करता येईलच असे घडत नाही, परंतु त्याच भवतालातील भावाशय घेऊन, तेच सौंदर्य कलाकृतीत बंदिस्त करून कलावंत मात्र नवनवीन रचना करतो. अशा रीतीने कलाकृती घडवताना कलावंताला जर जगण्यातलं चैतन्यत्व आपल्या कलाकृतीत नेमकेपणाने पकडता आलं नाही तर रसिकाला त्या कलाकृतीतून आनंद मिळू शकत नाही. या अर्थाने कोणत्याही कलाकृतीतील चैतन्यत्व रसास्वादात फार महत्त्वाची भूमिका बजावते असे म्हणता येईल.

अशा रीतीने कलाकृतीतील चैतन्याचे ‘विशिष्टत्व’ जाणणे, वेगळेपण जाणणे हा रसास्वादाचा उद्देश असतो. कलाकृतीतील विविध घटकांची वैशिष्टय़पूर्णता, त्यांची गुणवत्ता, त्यांचे परस्परसंबंध व या साऱ्यातून आकाराला आलेल्या परिपूर्ण अशा रचनाकृतीतील अनुभवरूपावर कलाकृतीतील एकूण चैतन्याची गुणवत्ता अवलंबून असते. या अर्थाने एखाद्या रसिक मनाला एखाद्या कलाकृतीतून आकळलेल्या चैतन्याच्या विशिष्ट आविष्काराला रसास्वादामध्ये विशेष महत्त्व असते.

थोडक्यात रसास्वाद म्हणजे रसिकाला एखाद्या कलाकृतीच्या आलेल्या अनुभवाची पुनर्मांडणी होय. एखाद्या कलाकृतीचा अनुभव उलगडताना तो ज्या विविध टप्प्याटप्प्याने अनुभवाला आला त्याचा सौंदर्यपूर्ण मागोवा घेत जाणं, त्या अनुभवाची सौंदर्यपूर्ण अशी पुनर्मांडणी करणं म्हणजे रसास्वादन होय. या अर्थाने रसास्वादाची पूर्ण क्रिया ही  सचेतन असते असे म्हटले जाते. कारण कोणत्याही कलाकृतीतील चैतन्याचा मागोवा घेताना तिच्यातील चैतन्यांशाला रसिकांतील चैतन्य तत्त्वाचा सहज स्पर्श होत असतो. या अर्थाने सौंदर्य निर्मिती व सौंदर्यास्वाद या दोघांचा मूलस्रोत एकच आहे असे म्हणता येईल. याच कारणास्तव ज्या व्यक्तीजवळ जीवनाचा आस्वाद घेण्याची वृत्ती नाही, रसिकता नाही ती व्यक्ती खऱ्या अर्थाने कलास्वाद घेऊ शकणार नाही असे म्हटले जाते.

कलावंत कलाकृती घडवताना जशी अभिव्यक्तीच्या मार्गावरची एक आनंददायी निर्मिती क्रीडा अनुभवत असतो तशीच आनंददायी आस्वाद क्रीडा एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेताना  कलारसिकाला अनुभवायला मिळत असते. जीवन जगत असताना येणाऱ्या असंख्य अनुभवांनी आपले अनुभव विश्व संपन्न होत असते. खरे तर हरेक अनुभव ही एक प्रकारची क्रीडाच असते आणि त्या क्रीडेचे म्हणून काही आंतरिक नियम असतात. जसजसे विविध अनुभवांतील आंतरिक नियम आपण आत्मसात करीत जातो तसतसे त्या त्या अनुभवाचा गाभा आपल्याला उलगडत जातो. या अर्थाने कोणत्याही कलाकृतीचा रसिकाला येणारा अनुभव हाच खऱ्या अर्थाने रसास्वादाचा मूलाधार असतो.

(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)