पाच वेळा ट्रॅफिक नियम मोडल्यास लायसन्स रद्द होणार

दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना आता काळजी घेणे आवश्यक आहे. ट्रॅफिक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची आता खैर केली जाणार नाही. 1 जानेवारी 2026 पासून ट्रॅफिकच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून, वर्षभरात जर पाचपेक्षा अधिक वेळा ट्रॅफिकचे नियम वाहनधारकाने मोडले, तर त्या वाहनधारकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे. या तीन महिन्यांत त्या वाहनधारकाला कोणत्याही ठिकाणी वाहन चालवता येणार नाही. जर हा वाहनधारक विनालायसन्स गाडी चालवताना आढळून आल्यास, त्याला मोठा दंड आकारला जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने यासंबंधीचे नवे नियम जारी केले आहेत. नव्या नियमानुसार, जर कोणत्याही वाहनचालकाने एका वर्षात पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळा ट्रॅफिक नियम मोडले, तर त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तत्काळ तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल. हा नियम नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आला आहे.

देशभरात असे बरेच वाहनचालक आहेत, जे सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवतात. ट्रॅफिक नियमांकडे गंभीरपणे पाहत नाहीत. याआधी लायसन्स रद्द करण्याची कारवाई तेव्हाच होत होती, जेव्हा वाहन चोरी, ओव्हरस्पीडिंग, ओव्हरलोडिंग किंवा प्रवाशांना मारहाण करण्यासारखी घटना घडली असेल तर. परंतु आता यात बदल करण्यात आला असून, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, रेड लाईट जंप करणे यांसारख्या चुका करणाऱ्यांनाही दंड ठोठावला जाणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षाचे मोजमाप हे त्या त्या वर्षी केले जाईल. जर मागील वर्षी वाहनचालकाने चार नियम मोडले असतील, तर ते पुढच्या वर्षी मोजले जाणार नाहीत.

वाहनचालकांना बाजू मांडण्याची संधी

कोणत्याही ड्रायव्हरचे लायसन्स थेट रद्द केले जाणार नाही. लायसन्स रद्द करण्याआधी त्या वाहनधारकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्याच्यावर थेट कारवाई केली जाणार नाही. केंद्रीय मोटार वाहन नियम 2026 अंतर्गत टोल बाकी असल्यास कठोर नियम करण्यात आले आहेत. टोल बाकी असल्यास एनओसी दिली जाणार नाही. फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण केले जाणार नाही. कमर्शियल वाहनांना नॅशनल परमिट मिळणार नाही, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.