
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मतदानासाठी फक्त १२ दिवस उरले आहेत. मतदानाची ५ फेब्रुवारी ही तारीख जवळ आली असतानाच ३६ हजार ५२८ मतदार दुबार असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मी अन्य मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असे लेखी हमीपत्र प्रत्येक दुबार मतदारांना द्यावे लागणार आहे.
रायगड जिल्ह्यात झेडपी निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीदेखील केली आहे. जिल्ह्यात ५९ गटांसाठी ३६१ तर ११८ गणांतून ६५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकूण १ हजार १७उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन व निवडणूक अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील असतानाच ३६ हजारांहून अधिक दुबार मतदार दिसून आल्याने ते एक मोठे आव्हान ठरणार आहे. २७ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर कोणाविरुद्ध कशी लढत होणार हे समजणार आहे.
निवडणूक आयोगाने सर्व जिल्हा परिषदांमधील संभाव्य दुबार मतदारांची यादी पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी त्याची पडताळणी करून एकाच मतदारसंघात एकाच केंद्रावर त्यांनी मतदान करावे यासाठी यंत्रणा राबविण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. यादी त्या त्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. त्यांना कोणत्याही एका मतदार संघातील एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणते असेल याची निवड मतदाराने करायची आहे. त्यानुसार मतदाराकडून तसा अर्ज भरून घेण्यात येणार आहे.
हे आहेत पर्याय
दोन किंवा त्यापेक्षा जास्त मतदारसंघात मतदार यादीत नाव असेल तर एका ठिकाणाची निवड करावी लागेल.
एकाच मतदारसंघात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल तर एका केंद्राची निवड.
दोन्ही पर्यायाला मतदाराकडून प्रतिसाद नसेल तर मतदार यादीतील नावापुढे दुबारचा शिक्का मारणार.
मतदार मतदानासाठी आला तर तेथेच त्यांचे मी या केंद्रावर मतदान करत असून अन्य केंद्रांवर मतदान करणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले जाईल.
तालुकानिहाय आकडा
अलिबाग : २ हजार २८२, मुरुड ८८२, पेण: ६ हजार ६०६, पनवेल : ७ हजार १२६, उरण ४ हजार ७५०, कर्जत : ३ हजार ९८, खालापूर : २८२, माणगाव ३ हजार २२३, तळा : ४६५, रोहा : २ हजार ३७, सुधागड ९८०, महाड २ हजार ६५३, पोलादपूर : ८९०, श्रीवर्धन : ७१७, म्हसळा : ५३७.


























































