
जय मलंग… श्री मलंग, हिंदूची वहिवाट… हीच मलंगमुक्तीची पौर्णिमेला मलंगगड दुमदुमून जातो. यावर्षीही हाच उत्साह पाहायला मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी मलंगमुक्ती आंदोलन होणार आहे. यादिवशी मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी वार्षिक स्नान, पालखी, गंधलेपन, नैवेद्य, महाआरती असे सर्व धार्मिक विधी हिंदू परंपरेप्रमाणेच करण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कल्याण शहरापासून ११ कि. मी. अंतरावर अंबरनाथ तालुक्यात श्री मलंगगड आहे. श्री मलंगगड हे स्थान गोरक्ष रांगेतील देवस्थान आहे. श्री मलंगगडावरील मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला मलंगबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येथे येत असतात. मात्र काही वर्षांपासून काही मुस्लिम संघटनांनी श्री मलंगगडावरील हे स्थान हाजी मलंग असल्याचा दावा केला आहे. याविरुद्ध हिंदू मंचने हरकत घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी हे सर्वधर्मीय स्थळ असल्याचे मान्य केले. मात्र मुस्लिम संघटना वक्फ बोर्डाचा हवाला देऊन हा दर्गा असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात आहे. असे असले तरी शिवसेनेच्या पुढाकाराने सर्व हिंदू संघटना दरवर्षी माघी पौर्णिमेला गडावर जाऊन हिंदू पद्धतीने उत्सव साजरा करतात. यावर्षीही तो साजरा केला जाणार आहे.
बैठकीला कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, भीमसेन मोरे, विधानसभाप्रमुख नारायण पाटील, महिला आघाडी संघटक जया तेजी, श्री मलंगगड तालुकाप्रमुख सुरेश पाटील, अंबरनाथचे शहरप्रमुख अभिजित काळे, संदीप पगारे, म्हारळ शहरप्रमुख प्रकाश चौधरी, उल्हासनगर शहरप्रमुख शिवाजी जावळे, उपशहरप्रमुख दिलीप मिश्रा, रामदास ढोणे आदी उपस्थित होते.
बंदोबस्तासाठी 700 पोलिसांचा फौजफाटा
श्री मलंग यात्रा उत्सवात शांतता राखण्याच्या अनुषंगाने उल्हासनगर पोलीस परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. उत्सव निर्विघ्न साजरा करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त गोरे यांनी यावेळी केले. यात्रेत कोणताही अघटित प्रसंग घडू नये यासाठी ७०० पोलीस आणि ५० पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनीही मार्गदर्शन केले.
























































